नवी दिल्ली - देशात कोरोनाचा हाहाकार पाहायला मिळत आहे. एकूण कोरोनाग्रस्तांची संख्या ही तब्बल दोन कोटींवर पोहोचली आहे. कोरोनाच्या संकटात डॉक्टर्स आणि आरोग्य क्षेत्रातील कर्मचारी अहोरात्र काम करत आहेत. आपल्या कुटुंबापासून दूर राहून ते कोरोना रुग्णांची सेवा करत आहेत. तसेच या संकटात अनेकांनी आपल्या जवळची माणसं देखील गमावली आहेत. कोरोनामुळे अनेक घरं उद्ध्वस्त झाली आहेत. डॉक्टर्स आणि त्यांच्या कुटुंबीयांना देखील कोरोनाची लागण झाली आहे. तरीही न डगमगता, मागे न हटता वैद्यकीय क्षेत्रातील कर्मचारी आपलं काम करत आहेत. अशीच एक घटना समोर आली आहे.
देश कोरोनाच्या संकटाचा सामना करत असताना एका नर्सने आपल्या आजीला गमावलं आहे. मात्र एकीकडे आजीचे निधन आणि दुसरीकडे कोरोनाकाळातील ड्युटी असताना नर्सने आपल्या कामाची निवड केली आहे. आजीच्या निधनाचं दु:ख बाजुला सारून पीपीई किट परिधान करून कामाला सुरुवात केली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, राखी असं या नर्सचं नाव असून त्या एम्समध्ये त्या नर्सिंग ऑफिसर आहेत. त्या मूळच्या केरळच्या रहिवासी आहेत. राखी यांचे पती देखील नर्सिंग ऑुफिसर आहेत. राखी एक वर्षाच्या असतानाच त्यांच्या आईचं निधन झालं. त्यानंतर त्यांच्या आजीने त्यांचा सांभाळ केला. त्यामुळे त्या आजीलाच आई म्हणतात.
राखी यांच्या आजीला देखील कोरोनाची लागण झाली होती. उपचारादरम्यान त्यांचा केरळमध्ये मृत्यू झाला आहे. राखी यांचं तीन वर्षांपूर्वी लग्न झालं आहे. मात्र तेव्हापासून त्या आपल्या आजीला भेटू शकल्या नाहीत. त्यानंतर आता कोरोनामुळे त्यांचं निधन झालं आहे. "कोरोना ड्युटी असल्याने मी सध्या केरळला जाऊ शकत नाही. माझी नाईट शिफ्ट सुरू आहे आणि मी रुग्णांना प्राथमिकता देत आहे. मी केरळला गेली तरी आजीचा चेहरा पाहू शकत नाहीत. म्हणूनच मी माझं कर्तव्य निभावत आहे कारण मी प्रत्येक कोरोना रुग्णात माझ्या आजीचा चेहरा पाहते आणि त्यांची सेवा करणं हाच माझा पहिला धर्म आहे" असं राखी यांनी म्हटलं आहे.
राखी गेल्या कित्येक दिवसांपासून कोरोना रुग्णांची सेवा करत आहेत. त्यांना एक वर्षाचा लहान मुलगा आहे. कोरोना संक्रमणापासून स्वत:चा बचाव करत त्या काम करत आहेत. याच दरम्यान आजीचं कोरोनामुळे निधन झालं. आज जसे सर्व आरोग्य क्षेत्रातील कर्मचारी आपलं काम करत आहेत. तसंच मी देखील माझं काम करत आहे. त्यामुळेच रुग्णांची सेवा सध्या महत्त्वाची आहे. मात्र ज्या आजीने मला शिकून मोठं केलं. एक उत्तम व्यक्ती केलं. तिचच शेवट्चं दर्शन घेता आलं नाही याचं खूप दु:ख आहे असं राखी यांनी म्हटलं आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.
एका डॉक्टरने आपल्या कुटुंबातील तीन सदस्य कोरोनामुळे गमावले आहेत. मात्र तरी देखील ती डॉक्टर हे दु:ख बाजूला सारून रुग्णांची मदत करत आहे. स्वप्ना असं या डॉक्टरचं नाव आहे. कोरोनाने डॉक्टर स्वप्ना यांची आई, वडील आणि भाऊ त्यांच्याकडून हिरावले. मात्र, तरीही स्वप्ना यांनी आपलं काम न सोडता त्या कोरोना रुग्णांवर उपचार करत राहिल्या. डॉक्टर स्वप्ना यांचे पतीही डॉक्टर असून ते सध्या कोरोना रुग्णांवर उपचार करत आहेत. बिहारच्या मुझफ्फरपूर येथील रहिवासी असलेल्या डॉक्टर स्वप्ना आपल्या पती आणि दोन मुलांसोबत राहातात. त्या स्त्रीरोगतज्ञ आहेत. अशात त्यांच्यावर कोरोनाबाधित महिलांची प्रसूती आणि त्यांच्यावर उपचार करण्याची जबाबदारी आहे. मागील वर्षी ऑगस्ट महिन्यात डॉक्टर स्वप्ना यांच्या वडिलांचं निधन झालं. ते रुग्णांवर उपचार करत होते.