नवी दिल्ली - देशात कोरोनाचा हाहाकार पाहायला मिळत आहे. एकूण कोरोनाग्रस्तांची संख्या ही तब्बल दोन कोटींवर पोहोचली आहे. कोरोनाच्या संकटात डॉक्टर्स आणि आरोग्य क्षेत्रातील कर्मचारी अहोरात्र काम करत आहेत. आपल्या कुटुंबापासून दूर राहून ते कोरोना रुग्णांची सेवा करत आहेत. तसेच या संकटात अनेकांनी आपल्या जवळची माणसं देखील गमावली आहेत. कोरोनामुळे अनेक घरं उद्ध्वस्त झाली आहेत. डॉक्टर्स आणि त्यांच्या कुटुंबीयांना देखील कोरोनाची लागण झाली आहे. तरीही न डगमगता, मागे न हटता वैद्यकीय क्षेत्रातील कर्मचारी आपलं काम करत आहेत. अशीच एक घटना समोर आली आहे.
कोरोनाच्या संकटात एका गर्भवती नर्सने आपलं कर्तव्य निभावलं मात्र चिमुकलीच्या जन्मानंतर मृत्यूने तिलाच गाठल्याची हृदयद्रावक घटना समोर आली आहे. कोरोना काळात नर्स रुग्णांची सेवा करत होती. त्यानंतर बाळाला जन्म दिल्यावर दोघांनाही कोरोनाची लागण झाली होती. बाळाला वाचवण्यात डॉक्टरांना यश आलं मात्र यामध्ये नर्सला आपला जीव गमवावा लागला आहे. नर्सचे पती भेष कुमार बंजारे यांनी दिलेल्या माहितीनुसार, त्यांची पत्नी प्रभा गर्भवती असूनही कोविड वॉर्डमध्ये ड्युटी करत होती.
प्रभा यांची पोस्टिंग प्राथमिक आरोग्य केंद्र खैरवार खुर्द लोरमी (मुंगेली) येथे होती. गर्भवती असल्याने त्या एका गावात घरं भाड्याने घेऊन एकट्याच राहत होत्या. तसेच तेथूनच रुग्णालयात जात असे. 30 एप्रिल रोजी प्रभा यांनी प्रसुती वेदना सुरू झाल्यानंतर कवर्धा येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. सिझेरियन ऑपरेशनद्वारे त्यांनी एका मुलीला जन्म दिला. रुग्णालयात असताना त्यांना बर्याच वेळा ताप आला होता. त्यानंतर रुग्णालयामधून घरी आणण्यात आल्यानंतर त्रास आणखी वाढत गेला, खोकल्याचा त्रास जाणवत होता. त्यानंतर तिची अँन्टीजेन टेस्ट करण्यात आली त्यामध्ये ती पॉझिटिव्ह सापडल्यानंतर तिला कवर्धा येथील रुग्णालयात दाखल करण्यात आलं.
ऑक्सिजनची पातळी कमी होत गेल्याने प्रभा यांना रायपूरला हलवण्यात आलं. मात्र 21 मे रोजी त्यांचा मृत्यू झाला. आपण प्रभाला बर्याच वेळा सुटी घेण्यास सांगितले, पण ती तयार नव्हती. ती म्हणायची मी घरात बसून काय करणार? त्यापेक्षा मी काम करत राहिलेलं चांगलं आहे. तिनं गरोदरपणातही संपूर्ण 9 महिने रुग्णालयात काम केलं अशी माहिती त्यांच्या पतीने दिली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, रायपूरच्या धरसीनवा येथे राहणार्या प्रभाचे जून 2020 मध्ये लग्न झाले होते. कोरोनाच्या सर्व नियमांचे पालन करत लग्न केले होते. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.