नवी दिल्ली - देशात कोरोनाचा कहर पाहायला मिळत आहे. देशातील कोरोनाग्रस्तांचा आकडा दोन कोटींवर पोहोचला आहे. तर आतापर्यंत दोन लाखांहून अधिक लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. कोरोनाचा धोका टाळण्यासाठी वारंवार प्रशासनाकडून मास्क वापरण्याचा, सोशल डिस्टंसिंगचा सल्ला दिला जात आहे. मात्र अनेक ठिकाणी सोशल डिस्टंसिंगचा फज्जा उडालेला पाहायला मिळत आहे. लग्न सोहळ्याचं आयोजन करण्यात येत आहे. याच दरम्यान लग्न समारंभाला हजेरी लावणं काही लोकांना चांगलंच महागात पडलं आहे. कोरोनामुळे लग्नाच्या पाच दिवसानंतर नवरदेवाचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.
ओडिशातील केंद्रपाडा जिल्ह्यात मन सुन्न करणारी घटना घडली आहे. जिल्ह्यातील एका 26 वर्षीय तरुणाला कोरोनामुळे आपला जीव गमवावा लागला आहे. धक्कादायक बाब म्हणजे त्यांच्या लग्नाला अवघे पाच दिवस होत नाहीत तोवर त्याचा मृत्यू झाला आहे. नवरदेवाचा कोरोनाने मृत्यू झाल्यानंतर गावात एकच खळबळ उडाली आहे. अनेक लोकांच्या उपस्थितीत हा विवाहसोहळा संपन्न झाला होता. त्यामुळे लग्नाला हजेरी लावलेल्या सर्वांचा शोध आता प्रशासनाच्या शोध घेऊन आणि त्यांची चाचणी करण्याचं काम अधिकाऱ्यांनी सुरू केलं आहे. यामुळे कोरोना संक्रमणाचा मोठा धोका निर्माण झाला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, राजकनिका पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या दुर्गादेवी पाडा गावात राहणाऱ्या संजय कुमार नायक याचा विवाह 11 मे रोजी पार पडला होता. नायक आपल्या विवाहासाठी बंगळुरूला आला होता. त्यावेळी त्याला ताप आणि कोविडची इतर लक्षणं जाणवत होती. विवाहानंतर लगेचच प्रकृती बिघडल्याने संजय नायक याची कोरोना चाचणी करण्यात आली. 13 मे रोजी करण्यात आलेल्या चाचणीत तो कोरोना पॉझिटिव्ह असल्याचं स्पष्ट झालं होतं. नवरदेवाचा कोरोनामुळे मृत्यू झाल्याने गावकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
राजकनिकाच्या सार्वजनिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी विवेक राऊत यांनी दिलेल्या माहितीनुसार, सुरुवातीला कोरोना पॉझिटिव्ह आढळलेल्या संजय नायक याला घरीच क्वारंटाईनमध्ये ठेवण्यात आलं होतं. मात्र त्याची प्रकृती बिघडल्यानंतर त्याला तातडीने भुवनेश्वरच्या एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. त्यानंतर 15 रोजी त्याचा कोरोनामुळे मृत्यू झाला. लग्न सोहळ्याला एकूण किती जण उपस्थित होते. त्यांचा सध्या अधिकारी शोध घेत आहेत. तसेच नवरदेवाच्या घरातील मंडळींचे कोरोना चाचणीसाठी नमुने घेण्यात आले आहेत. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.