नवी दिल्ली - वेगाने पसरणाऱ्या कोरोनामुळे लोकांच्या मनात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. देशातील कोरोनाग्रस्तांची संख्या कमी झाली असून रुग्णांचा आकडा 3,02,79,331 वर पोहोचला आहे. गेल्या 24 तासांत कोरोनाचे 46,148 नवे रुग्ण आढळून आले आहेत. तर 979 जणांचा मृत्यू झाला आहे. कोरोनामुळे आतापर्यंत देशभरात तब्बल 3,96,730 लोकांना जीव गमवावा लागला आहे. याच दरम्यान डेल्टा व्हेरिएंटचा हाहाकार पाहायला मिळत आहे. कोरोनाच्या डेल्टा प्लस व्हेरिएंटच्या रुग्णांची संख्या वाढत असल्याने प्रशासनाची चिंता वाढली आहे. ओडिशातील 62 वर्षीय व्यक्तीला डेल्टा प्लस व्हेरिएंटची लागण झाली होती. त्यांनी आता कोरोनावर मात केली आहे.
रुग्णाने आपला अनुभव सांगत डेल्टा प्लस व्हेरिएंटवर कशी मात केली हे सांगितलं आहे. मिळालेल्या माहितीनुसार, देवगडच्या बारकोट ब्लॉकमध्ये राहणाऱ्या या रुग्णाने एक महिन्याच्या आत कोरोनाला हरवलं आहे. याचाच अनुभव त्यांनी सांगितला आहे. कोरोनाची लागण झाल्यावर ते घरीच राहिले. "मी डॉक्टरांच्या सर्व सूचनाचं योग्य ते पालन केलं. त्यामुळे कोरोनावर मात करण्यास लवकर मदत झाली. 23 एप्रिल रोजी मला अंगदुखी आणि फ्लूसारखी लक्षणे जाणवू लागली" अशी माहिती रुग्णांने दिली आहे.
"26 एप्रिल रोजी मला कोरोनाची चाचणी केल्यानंतर समजलं की, मला डेल्टा प्लस व्हेरिएंट संसर्ग झाला आहे. त्याआधी मी 30 मार्च रोजी कोविशिल्ड लसीचा पहिला डोस देखील घेतला होता. मला कोरोनामुक्त होण्यास 20 ते 25 दिवस लागले. चांगली गोष्ट अशी आहे की, मला रुग्णालयामध्ये जाण्याची गरज पडली नाही" असं देखील म्हटलं आहे. तर दुसरीकडे देवगडचे मुख्य जिल्हा वैद्यकीय अधिकारी (सीडीएमओ) एमके उपाध्याय यांनी दिलेल्या माहितीनुसार, या 62 वर्षीय कोरोना रुग्णाच्या गावात 10 एप्रिल ते 30 एप्रिल दरम्यान एकूण 81 लोकांना कोरोनाचा संसर्ग झाला होता.
62 वर्षीय व्यक्तीला कोरोनाच्या डेल्टा प्लस व्हेरिएंटचा संसर्ग झाल्याच आढळून आलं. या व्हेरिएंटला केंद्र सरकारनं चिंतेची बाब असल्याचं दर्शवलं आहे. त्या व्यक्तीला डेल्टा प्लस व्हेरियंटची लागण झाल्याचे समजताच एपिडिमियोलॉजी टीम घटनास्थळी पोहोचली, असं एमके उपाध्याय यांनी म्हटलं आहे. टीममधील सदस्यांनी 81 मधील फक्त चार जणांना रुग्णालयात उपचारासाठी दाखल व्हावं लागलं ही माहिती दिली आहे. बाकीचे सर्व जण हे घरच्या घरीच ठणठणीत झाले. तसेच गावात एकाचाही कोरोनामुळे मृत्यू झाला नाही. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.