नवी दिल्ली - देशात कोरोनाचा हाहाकार पाहायला मिळत आहे. रुग्णांची आणि मृतांची संख्या प्रशासनाच्या चिंतेत भर पाडत आहे. गेल्या काही दिवसांपासून कोरोनाच्या नव्या रुग्णांच्या संख्येत घट होत आहे. मात्र असं असली तर मृतांचा आकडा हा वाढताना दिसत आहे. कोरोनामुळे देशातील तब्बल दोन लाखांहून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे. काही ठिकाणी कोरोनामुळे गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे. स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यासाठी जागाच नसल्याचं चित्र आहे. अशातच अनेक धक्कादायक घटना समोर येत आहे. देशात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा कहर पाहायला मिळत असतानाच मृतांची संख्या वाढत आहे. नातेवाईकांना मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्यासाठी सौदा करावा लागत असल्याचा भयंकर प्रकार समोर आला आहे.
हैदरामध्ये एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. अनेक लोकांना कोरोनामुळे मृत्यू झालेल्या आपल्या नातेवाईकांचे अंत्यसंस्कार करण्यासाठी स्मशानभूमीतील लोकांना खूप पैसे द्यावे लागत असल्याच्या घटना घडल्या आहेत. अंत्यसंस्कारासाठी वेटिंग लिस्ट असून त्यासाठी बक्कळ पैसे मागितले जात आहेत. हैदराबादमध्ये कोरोना रुग्णावर अंत्यसंस्कार करण्यासाठी तब्बल 70 हजार रुपयांची मागणी केली जात असल्याची माहिती समोर आली आहे. सरकारने कोरोना रुग्णांवर अंत्यसंस्कार करण्यासाठी काही नियम तयार केले आहेत. खासगी रुग्णालयांना जास्तीत जास्त आठ हजार घेता येतील असं निश्चित केलं आहे. एखाद्या व्यक्तीचं सरकारी रुग्णालयामध्ये कोरोना उपचारांदरम्यान निधन झालं किंवा अनोळखी व्यक्तीचा मृतदेह आढळून आल्यास त्यावर मोफत अंत्यसंस्कार करण्यात येणार असल्याचं म्हटलं आहे.
सरकारने अंत्यसंस्कारासाठी काही नियम केले असले तरी हैदराबादमध्ये अनेक लोकांना एका व्यक्तीचे अंत्यसंस्कार करण्यासाठी 25,000 ते 70,000 द्यावे लागत आहेत. रोख रक्कम द्यावी लागत आणि आणि याची कोणतीही पावती मृतांच्या नातेवाईकांना दिली जात नाही. हैदराबादमधील एका महिलेने तिच्या पतीचा कोरोनामुळे मृत्यू झाल्यानंतर अंत्यसंस्कारासाठी 50 हजार रुपये दिल्याचं म्हटलं आहे. तसेच पैसे दिल्यावरही या व्यक्तींवर कुठे आणि कसे अंत्यस्कार करण्यात आले याची माहिती देण्यात आलेली नाही. या महिलेच्या पतीवर गांधी रुग्णालयामध्ये उपचार सुरू होते. मात्र मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यात पतीचा मृत्यू झाल्यानंतर मी त्यांच्या अंत्यविधीसाठी 50 हजार रुपये रोख रक्कम दिल्याची माहिती आता महिलेने दिली आहे.
एका व्यक्तीने दिलेल्या माहितीनुसार, त्याच्या वडिलांचा सरकारी रुग्णालयामध्ये कोरोनामुळे मृत्यू झाल्यानंतर अंत्यसंस्कारासाठी त्याच्याकडे 70 हजारांची मागणी करण्यात आली. एका स्वयंसेवी संस्थेशीसंबंधित व्यक्तीने दिलेल्या माहितीनुसार, पैसे नसल्याने अनेकांना आपल्या नातेवाईकांवर अंत्यस्कार करता येत नाहीत. त्यामुळेच अनेक रुग्णालयांमध्ये मृतदेह पडून आहेत. आमच्या संस्थेने आतापर्यंत 180 मृतदेहांवर अंत्यसंस्कार केल्याची माहिती दिली आहे. कोरोनामुळे अनेकांना आपल्या कुटुंबातील सदस्य गमवावे लागत आहेत. काही ठिकाणी परिस्थिती गंभीर आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.