नवी दिल्ली - देशात कोरोनाचा कहर पाहायला मिळत असून रुग्णांच्या संख्येने तब्बल तीन कोटींचा टप्पा पार केला आहे. जगभरात कोरोनावर संशोधन सुरू आहे. याच दरम्यान महत्त्वाची माहिती आता समोर आली आहे. इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी (IIT), मंडी (IIT Mandi Researchers) आणि इंटरनॅशनल सेंटर फॉर जेनेटिक इंजिनीअरिंग अँड बायोटेक्नॉलॉजी (ICGEB) च्या संशोधकांना हिमालयातील 'बुरांश' (Himalay Plant Buransh) या वनस्पतीच्या पानांमध्ये 'फायटोकेमिकल' आढळून आले आहे. करोना संसर्गाच्या उपचारांसाठी याचा उपयोग केला जाऊ शकतो. फायटोकेमिकल्स ही वनस्पतींमध्ये नैसर्गिकरित्या उपलब्ध असतात आणि आरोग्यासाठी फायदेशीर ठरू शकतात.
हिमालयीन वनस्पती बुरांश किंवा हिमालयीन प्रदेशात आढळणाऱ्या 'रोडोडेंड्रॉन अरबोरियम' या वनस्पतीच्या रासायन युक्त पानांमध्ये व्हायरसविरोधी किंवा व्हायरसशी लढण्याची क्षमता आहे, असे संशोधनात असे दिसून आले आहे. या संशोधनाचे निष्कर्ष नुकतेच 'बायोमॉलेक्युलर स्ट्रक्चर अँड डायनामिक्स' या जर्नलमध्ये प्रकाशित झाले आहेत. कोविड-19 महामारीचा उद्रेक होऊन जवळपास दोन वर्षे झाली आहेत आणि संशोधक या व्हायरसचे स्वरूप समजून घेण्याचा आणि संसर्ग टाळण्यासाठी नवीन मार्ग शोधण्याचा प्रयत्न करत आहेत, असे संशोधन पथकाचे म्हणणे आहे.
IIT मंडीतील स्कूल ऑफ बेसिक सायन्सचे प्राध्यापक श्याम कुमार मसकपल्ली यांनी दिलेल्या माहितीनुसार, "कोरोना व्हायरसविरूद्ध शरीराला लढण्याची क्षमता देणारा एक मार्ग म्हणजे लसीकरण आहे. पण लसीशिवाय मानवी शरीरावरील व्हायरसचा हल्ला रोखू शकणाऱ्या औषधांचा शोध जगभरात सुरू आहे. या औषधांमध्ये अशी रसायने असतात जी एकतर आपल्या शरीराच्या पेशींमधील रिसेप्टर किंवा ग्राही प्रोटीन्स मजबूत करतात आणि व्हायरसला त्यांच्यात प्रवेश करण्यापासून रोखतात किंवा व्हायरसवरच हल्ला करतात आणि त्याचे परिणाम आपल्या शरीरात रोखतात.विविध उपचार पद्धतींचा अभ्यास केला जात आहे, ज्यात वनस्पतींपासून मिळणाऱ्या फायटोकेमिकल्सचा समावेश आहे. कारण त्यांच्या सहक्रियात्मक हालचालींमुळे आणि कमी विषारी तत्वांसह नैसर्गिक स्रोत म्हणून ते महत्त्वाचे मानले जातात."
स्थानिक लोक आरोग्याच्या विविध प्रकारच्या फायद्यांसाठी हिमालयीन वनस्पती बुरांशच्या पानांचे सेवन करतात असंही सांगितलं आहे. तसेच "शास्त्रज्ञांच्या टीमने फायटोकेमिकल्स असलेल्या अर्काची वैज्ञानिकदृष्ट्या तपासणी केली आणि विशेषत: त्यांच्या अँटीव्हायरल क्रियेवर लक्ष केंद्रीत केले. संशोधकांनी बुरांशच्या पानांमधून वनस्पती रसायने काढली आणि त्याचे व्हायरसविरोधी गुणधर्म समजून घेण्यासाठी त्यांचा अभ्यास केला" असं मसकपल्ली यांनी म्हटलं आहे. तर आम्ही हिमालयातून मिळवलेल्या रोडोडेंड्रॉन आर्बोरियमच्या पानांच्या वनस्पती रसायनांचे विश्लेषण केले आणि ते कोरोना व्हायरसविरूद्ध प्रभावी असल्याचं आढळलं असं ICGEB शी संबंधित रंजन नंदा यांनी म्हटलं आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.