नवी दिल्ली - देशात कोरोनाचा कहर पाहायला मिळत आहे. देशभरातील अनेक रुग्णालयात कोरोना रुग्णांवर उपचार सुरू आहेत. मात्र रुग्णांची झपाट्याने वाढणारी संख्या, बेड्सची आणि ऑक्सिजनची कमतरता सर्वत्र जाणवत आहे. काही रुग्णालयांनी आपल्या रुग्णालयाबाहेर बेड आणि ऑक्सिजन नसल्याचं पोस्टर लावले आहेत. ऑक्सिजनची कमतरता असल्याने आपल्या रुग्णाला इतर ठिकाणी हलवा असं रुग्णालयाच्या वतीने देखील सांगण्यात आलं आहे. डॉक्टर्सही या गंभीर परिस्थिती पुढे हतबल झाले आहेत. याच दरम्यान हरियाणामध्ये एक धक्कादायक घटना समोर आली आहे. भावाला ऑक्सिजन सिलिंडर न मिळाल्याच्या रागात जवानाकडून मंत्र्यांना धमकी देण्यात आली आहे.
हरियाणाच्या रेवाडी जिल्ह्यात राहणाऱ्या भारतीय लष्करातील एका जवानाच्या कोरोनाग्रस्त लहान भावाला ऑक्सिजन सिलिंडरची (Oxygen Cylinder) गरज होती. पण तो मिळालाच नाही. जवानाने ऑक्सिजन सिलिंडर न मिळाल्याने एक व्हिडीओ शूट केला असून त्यामध्ये गुरुग्रामचे खासदार आणि केंद्रीय मंत्री राव इंद्रजीत सिंह (Rao Inderjeet Singh) यांना व त्यांच्या कुटुंबीयांना गोळ्या घालून जीवे मारण्याची धमकी दिली आहे. हा व्हिडीओ जोरदार व्हायरल झाला आहे. रामपुरा पोलीस स्टेशनमध्ये या जवानाविरुद्ध जीवे मारण्याची धमकी देण्याचा गुन्हा नोंदवण्यात आला आहे अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.
हरियाणातील रेवाडी (Rewari) जिल्ह्यात असणारा हा जवान असल्याचं व्हिडीओमध्ये म्हटलं आहे. माझ्या लहान भावाला कोरोनाची लागण झाली आहे आणि त्याची प्रकृती गंभीर आहे. मी रेवाडीत शोधलं पण एकाही ठिकाणी मला ऑक्सिजन सिलिंडर मिळाला नाही. गुरुग्राममधून मला 70 हजार रुपयांना ऑक्सिजन सिलिंडर (Oxygen Cylinder) घ्यावा लागला. यानंतर त्याने केंद्रीय मंत्री इंद्रजीत सिंह यांना शिव्या दिल्या. मंत्री आणि त्यांच्या कुटुंबीयांना गोळी मारून ठार मारण्याची धमकीही या जवानाने या व्हिडीओमध्ये दिली आहे.
केंद्रीय मंत्र्यांच्या खासगी सचिवांनी दिलेल्या माहितीनुसार, या व्यक्तीने गलिच्छ भाषा वापरून मंत्र्यांची प्रतिमा मलिन करण्याचा प्रयत्न केला आहे. रामपुरा पोलीस स्टेशनमध्ये आयटी कायदा आणि जीवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी या व्यक्तीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर पोलिसांनी या व्हिडीओत त्या व्यक्तीने आपलं नाव सांगितलं नाही, पण तो रेवाडी जिल्ह्यातला रहिवासी आहे हे सांगितलं आहे. त्यावरून आम्ही त्याचा शोध घेत आहोत. अधिक तपास सुरू आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.