नवी दिल्ली - देशात कोरोनाने थैमान घातले आहे. देशातील कोरोनाग्रस्तांची संख्या 2,60,31,991 वर पोहोचली आहे. गेल्या 24 तासांत कोरोनाचे 2,59,591 नवे रुग्ण आढळून आले आहेत. तर 4,209 जणांचा मृत्यू झाला आहे. कोरोनामुळे आतापर्यंत देशभरात तब्बल 2,91,331 लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. अनेक सेलिब्रिटींना, नेते मंडळींना कोरोनाची लागण झाली असून काहींचा मृत्यू झाला आहे. अशीच एक धक्कादाय़क घटना समोर आली आहे. प्रसिद्ध मूर्तीकार आणि राज्यसभेचे खासदार रघुनाथ मोहपात्रा (Raghunath Mohapatra) यांचे काही दिवसांपूर्वी कोरोनामुळे निधन झाले आहे.
रघुनाथ मोहपात्रा यांच्या निधनानंतर आता त्यांच्या दोन मुलांचा देखील मृत्यू झाला आहे. दोन्ही मुलांना कोरोनामुळे आपला जीव गमवावा लागला आहे. यामुळे मोहपात्रा कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. ओडिशा क्रिकेट संघाचा माजी कर्णधार प्रशांत मोहपात्रा यांचे कोरोनामुळे स्थानिक एम्स रुग्णालयात बुधवारी निधन झाले. 47 वर्षांच्या प्रशांत यांच्यावर उपचार सुरू असताना बुधवारी सकाळी त्यांनी अखेरचा श्वास घेतल्याची माहिती आरोग्य अधीक्षकांनी दिली. 1990 मध्ये रणजी स्पर्धेत पदार्पण करणाऱ्या प्रशांत यांनी 45 प्रथमश्रेणी सामने खेळले. निवृत्तीनंतर ‘बीसीसीआय’ने त्याची मॅच रेफ्री म्हणून नियुक्ती केली होती.
प्रशांत यांचे मोठे बंधू आणि रघुनाथ मोहपात्रा याचे पुत्र जशवंत यांना देखील कोरोनाची लागण झाली होती. रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते. प्रकृती अधिक बिघडल्याने एम्समधून त्यांना एसयूएम कोविड रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र उपचारादरम्यान आता त्यांचा मृत्यू झाला आहे. कुटुंबातील तीन सदस्यांचा कोरोनाने मृत्यू झाल्यामुळे कुटुंबीयांना मोठा धक्का बसला आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले जात आहेत. मास्क, सोशल डिस्टंसिंग, होम क्वारंटाईन आणि आयसोलेशनच्या माध्यमातून योग्य ती खबरदारी घेतली जात आहे.
बापरे! निवडणुकीने घात केला अन् कोरोना झाला; मध्य प्रदेशमध्ये 17 शिक्षकांना गमवावा लागला जीव
देशात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने थैमान घातलेले असताना मध्य प्रदेशच्या दमोहमध्ये झालेली पोटनिवडणूक अनेकांच्या जीवावर बेतली आहे. निवडणुका पार पाडण्यासाठी दमोह जिल्ह्यातील 800 शिक्षकांची ड्युटी लावण्यात आली होती. यापैकी 200 शिक्षकांनानिवडणूक प्रशिक्षण आणि मतदान संपल्यानंतर कोरोनाची लागण झाली आहे. तर ड्युटीवर असलेल्या कमीतकमी 17 जणांनी कोरोनामुळे आपला जीव गमवावा लागला आहे. निवडणुकीमुळे कोरोनाची लागण झाली आणि त्यातच अनेकांचा मृत्यू झाला आहे. कोरोनाची लागण झालेल्यांमध्ये शिक्षक, राजकीय कार्यकर्ते आहेत. शिक्षकांच्या कुटुंबीयांनी सरकारवर रोष व्यक्त केला आहे. दमोह येथील 58 वर्षीय सरकारी शिक्षक, ब्रजलाल अहिरवार यांनाही पोटनिवडणुकीवर तैनात करण्यात आले होते. त्यांचे कोरोनामुळे निधन झाले.