नवी दिल्ली - जगभरात कोरोनाचा हाहाकार पाहायला मिळत आहे. रुग्णांच्या संख्येने तब्बल दीड कोटींचा टप्पा परा केला असून कोरोनामुळे आतापर्यंत दोन लाखांहून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे. देशभरातील अनेक रुग्णालयात कोरोनाग्रस्तांवर उपचार सुरू आहेत. काही ठिकाणी बेड्स आणि ऑक्सिजनची कमतरता भासून लागली आहे. कोरोनामुळे परिस्थिती गंभीर झाली आहे. याच दरम्यान अनेक धक्कादायक घटना समोर येत आहेत. आंध्र प्रदेशमध्ये मन सुन्न करणारी घटना घडली आहे. आईचा मृतदेह नेण्यासाठी रुग्णवाहिका अथवा इतर वाहन न मिळाल्याने एका मुलावर बाईकवरून मृतदेह नेण्याची वेळ आली आहे.
मुलाने बाईकवरून आपल्य़ा आईचा मृतदेह हा स्मशानभूमीत नेला आणि अंत्यसंस्कार केले आहेत. सोशल मीडियावर या धक्कादायक घटनेचा व्हिडीओ जोरदार व्हायरल होत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, आंध्र प्रदेशातील श्रीकाकुलम जिल्ह्यात सोमवारी ही मन हेलावून टाकणारी घटना घडली आहे. जी चेन्चुला असं 50 वर्षीय महिलेचं नाव आहे. रुग्णवाहिका न मिळाल्यामुळे तिच्या अंत्यसंस्कारासाठी लेकाला काही समस्यांना सामोरं जावं लागलं. महिलेमध्ये कोरोनाची लक्षणे होती. त्यांची चाचणी करण्यात आली होती. रिपोर्ट येण्याआधीच तिची प्रकृती बिघडली आणि मृत्यू झाला.
महिलेची तब्येत बिघडल्याने तिला तातडीने रुग्णालयात हलविण्यात आले होते. मात्र उपचार सुरू करण्याआधीच तिचा मृत्यू झाला. मृतदेह नेण्यासाठी कुटुंबीयांनी रुग्णवाहिका किंवा वाहन मिळाले नाही. अखेर मुलाने आईचा मृतदेह बाईकवरुन नेण्याचे ठरवले. आईचा मृत्यू हा आरोग्य यंत्रणेच्या हलगर्जीपणामुळे चा झाल्याचा आरोप संबंधित तरुणाने केला आहे. सिटीस्कॅनचा रिपोर्ट मिळवण्यासाठी तासन् तास खर्च घालवले. त्यामुळे आईवर वेळीच उपचार होऊ शकले नाही असा दावा तरुणाने केला आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.
भीषण वास्तव! ना ऑक्सिजन, ना उपचार; हतबल बापाने बाईकवरून घरी आणला लेकीचा मृतदेह; मन सुन्न करणारी घटना
देश कोरोनाच्या संकटाचा सामना करत असताना अनेक धक्कादायक घटना समोर येत आहेत. अशीच एक भयंकर घटना आता समोर आली आहे. उत्तर प्रदेशच्या फिरोजाबादमध्ये मन सुन्न करणारी घटना घडली आहे. ऑक्सिजन आणि उपचार न मिळाल्याने एका मुलीचा मृत्यू झाला आहे. शेवटी हतबल झालेल्या बापाने बाईकवरून लेकीचा मृतदेह घरी आणला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, फिरोजाबादमधील एका मुलीला श्वास घेण्यास त्रास होऊ लागला. तिची प्रकृती गंभीर असल्याने तिच्या वडिलांना तिला बाईकवरून सरकारी ट्रामा सेंटरमध्ये नेले.
सरकारी ट्रामा सेंटरमध्ये ऑक्सिजनच उपलब्ध नसल्याने तिला उपचारासाठी दाखल करून घेण्यात आले नाही. वेळेत योग्य उपचार आणि ऑक्सिजन न मिळाल्याने मुलीला आपला जीव गमवावा लागला आहे. डॉक्टरांनी मुलीला मृत घोषित केलं. मात्र त्यानंतर तिला घरी घेऊन जाण्यासाठी रुग्णवाहिका देखील मिळाली नाही. शिवनारायण यांच्या मुलीची प्रकृती ही अचानक बिघडली होती. तिला श्वास घेण्यास त्रास होत होता. रुग्णवाहिका बोलवण्यासाठी त्यांनी अनेकदा फोन केला. मात्र रुग्णवाहिका आलीच नाही. मुलीची प्रकृती आणखी बिघडत असल्याने वडिलांनी तिला बाईकवरून नेले आणि तातडीने रुग्णालय गाठले. मात्र तिथे ऑक्सिजनच उपलब्ध नसल्याने वडिलांच्या डोळ्यादेखतचं मुलीचा जीव गेला आहे.