नवी दिल्ली - देशात कोरोनाचा उद्रेक होताना पाहायला मिळत आहे. रुग्णांची संख्या सातत्याने नवा उच्चांक गाठत असून धडकी भरवणारी आकडेवारी पुन्हा एकदा समोर येत आहे. देशातील कोरोनाग्रस्तांची संख्या वाढली असून रुग्णांचा आकडा तब्बल 1,35,27,717 वर गेला आहे. याच दरम्यान एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. कोरोनाचा सर्वोच्च न्यायालयाला (Supreme Court) मोठा फटका बसला आहे. सर्वोच्च न्यायालयातील 50 टक्के स्टाफला कोरोनाची लागण झाल्याची माहिती आता समोर आली आहे.
सर्वोच्च न्यायालयातील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाल्याने सर्वोच्च न्यायालयातील न्यायाधीश घरातूनच व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून सुनावणी घेणार आहेत. सर्वोच्च न्यायालयाचा संपूर्ण परिसर आणि कोर्ट रुम सॅनिटाईज करण्यात येत आहे. याच पार्श्वभूमीवर सर्व ठरलेल्या प्रकरणांवरील सुनावणी एक तास उशिराने होणार आहे. "माझ्या अनेक कर्मचार्यांना आणि लिपिकांना कोरोनाची लागण झाली आहे. काही न्यायाधीशांना यापूर्वीच कोरोनाची लागण झाली होती मात्र आता ते बरे झाले आहेत" अशी माहिती एका न्यायाधीशांनी एनडीटीव्हीसोबत बोलताना दिली आहे.
नवा उच्चांक! गेल्या 24 तासांत तब्बल 1,68,912 नवे रुग्ण, एक कोटीचा टप्पा केला पार
देशात कोरोनाचा धोका वाढला असून गेल्या 24 तासांत रुग्णसंख्येत विक्रमी वाढ झाली आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने सोमवारी (12 एप्रिल) दिलेल्या माहितीनुसार, देशात गेल्या 24 तासांत कोरोनाचे 1,68,912 नवे रुग्ण आढळून आले आहेत. तर 904 जणांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे देशातील कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या 1,35,27,717 वर पोहोचली असून कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांचा आकडा दीड लाखांवर पोहोचला आहे. देशातील कोरोनाग्रस्तांपैकी 12,01,009 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. तर 1,21,56,529 रुग्ण उपचारानंतर बरे झाले असून त्यांना घरी सोडण्यात आले आहे.
कोरोनाचा भयावह वेग! दिल्लीच्या AIIMS मधील तब्बल 35 डॉक्टर पॉझिटिव्ह, आरोग्य विभागात खळबळ
कोरोनाचा कहर पाहायला मिळत असताना एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. अनेक ठिकाणी रुग्णालयात रुग्णांची अहोरात्र सेवा करणाऱ्या डॉक्टरांना देखील कोरोनाची लागण झाल्याची माहिती मिळत आहे. सर गंगाराम रुग्णालयानंतर आता दिल्लीतील एम्स रुग्णालयातही (Delhi AIIMS) कोरोना थैमान घातले आहे. या रुग्णालयातील तब्बल 35 डॉक्टर कोरोना पॉझिटिव्ह आढळल्याची घटना समोर आली आहे. कोरोनाची लागण झालेल्या डॉक्टरांमध्ये ज्युनिअर, सीनिअर अशा सर्व डॉक्टर्सचा समावेश आहे. काही डॉक्टरांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. कोरोनामुळे लोकांच्या मनात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. याआधी सर गंगाराम रुग्णालयात 37 डॉक्टर कोरोना पॉझिटिव्ह सापडले. त्यापैकी पाच जणांवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत तर इतरांना होम आयोसेलेशनमध्ये ठेवण्यात आलं आहे. या डॉक्टरांनी कोरोना लसीचा डोस घेतला होता.