नवी दिल्ली - देशात कोरोनाचा हाहाकार पाहायला मिळत आहे. रुग्णांच्या संख्येत मोठी वाढ होत आहे. आज कोरोनाचे तब्बल चार लाख नवे रुग्ण आढळून आले आहेत. कोरोनामुळे लोकांना आरोग्यविषयक विविध समस्यांचा सामना करावा लागत आहे. अशीच धडकी भरवणारी माहिती आता पुन्हा एकदा समोर आली आहे. कोरोना रुग्णांना एका नव्या आजाराचा सामना करावा लागत आहे. धक्कादायक बाब म्हणजे योग्य वेळी जर यावर उपचार झाले नाहीत तर रुग्णांना आपले डोळे गमवावे लागत आहेत. "म्यूकोरमायसिस" असं या आजाराचं नाव असून कोरोना रुग्णांमध्ये हे प्रामुख्याने पाहायला मिळत आहे.
"म्यूकोरमायसिस" हे एक गंभीर इन्फेक्शन आहे. ज्याचा परिणाम नाक, डोळ्यांवर होतो आणि मेंदूपर्यंतही हे इन्फेक्शन पोहोचतं. या इन्फेक्शनमुळे रुग्णांचे डोळेही काढावे लागत आहेत. सूरतमध्ये जीव वाचवण्यासाठी तब्बल 8 रुग्णांचे हे डोळे काढण्यात आले आहेत. गुजरातच्या सूरत शहरात गेल्या 15 दिवसांत अशी 40 प्रकरणं सापडली आहेत. त्यापैकी 8 रुग्णांचे डोळे काढावे लागल्याची घटना समोर आली आहे. देश कोरोनाच्या संकटाचा सामना करत असताना आता आणखी एका फंगसचा धोका निर्माण झाला आहे. कोरोनानंतर आता 'ब्लॅक फंगस'चा मोठा धोका असल्याची माहिती समोर आली आहे. यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.
दिल्लीत ब्लॅक फंगसचा कहर पाहायला मिळत असून त्याचे रुग्ण आढळून आले आहेत. दिल्लीतील एका खासगी रुग्णालयातील डॉक्टरांनी कोरोनामुळे "म्यूकोरमायसिस" प्रकरणांमध्ये वाढ झाल्याचं म्हटलं आहे. म्यूकोरमायसिस हे कोरोनामुळे होणारं एक फंगल संक्रमण आहे. यामध्ये डोळे, गळा आणि नाक यांना इजा पोहोचण्याची अधिक शक्यता आहे. सर गंगाराम रुग्णालयातील वरिष्ठ ईएनटी सर्जन डॉक्टर मनिष मुंजाल यांनी दिलेल्या माहितीनुसार, आम्हाला कोरोनानंतर होणाऱ्या फंगल संक्रमणात वाढ होताना दिसत आहे. गेल्या दोन दिवसांत म्यूकोरमायसिस पीडित सहा रुग्ण दाखल झाले आहेत. गेल्या वर्षी या संक्रमणामुळे मृत्यू दरही अधिक होता. यामुळे कित्येक लोकांना अंधत्व आलं होतं. तसेच नाक आणी गळ्याचं हाड गळून गेलं होतं."
संकटं संपता संपेना! कोरोनानंतर आता 'ब्लॅक फंगस'चा मोठा धोका; 'या' शहरात आढळले रुग्ण
रुग्णालयातील ईएनटी विभागाचे अध्यक्ष डॉ. अजय स्वरूप यांनी "मधुमेह असलेल्या कोरोना रुग्णांवर स्टेरॉईडचा उपयोग काळजीपूर्वक करावा लागतो. कारण त्यामुळे ब्लॅक फंगस होण्याची शक्यता आहे" असं सांगितलं. ब्लॅक फंगसची लक्षण कोरोनातून बरे झालेल्या रुग्णांमध्ये दिसून येत आहेत. खासकरून मधुमेह, किडनी, हृदयरोग आणि कर्करोगासारख्या आजारांनी पीडित लोकांमध्ये ही समस्या अधिक असल्याचं देखील त्यांनी म्हटलं आहे. भारतात कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी लॉकडाऊन सुरू आहे. याच दरम्यान चिंताजनक आकडेवारी समोर आली आहे. अशातच आता या आजाराचा धोका निर्माण झाला असल्याने प्रशासनाच्या चिंतेत भर पडली आहे.