नवी दिल्ली - देशात कोरोनाचा वेग हा गेल्या काही दिवसांपासून मंदावताना दिसत आहे. कोरोनाग्रस्तांची संख्या ही तब्बल 4 कोटींवर पोहोचली आहे. गेल्या 24 तासांत कोरोनाचे 1,233 नवे रुग्ण आढळून आले आहेत. तर 31 जणांचा मृत्यू झाला आहे. कोरोनामुळे आतापर्यंत देशभरात तब्बल पाच लाखांहून अधिक लोकांना जीव गमवावा लागला आहे. मास्क, सोशल डिस्टंसिंग, होम क्वारंटाईनच्या माध्यमातून काळजी घेतली जात आहे. याच दरम्यान भारताचं टेन्शन वाढलं आहे. तैवानहून भारतात फिरण्यासाठी आलेली एक महिला कोरोना पॉझिटिव्ह आढळून आली आहे. या घटनेनंतर आरोग्य विभागात एकच खळबळ उडाली आहे.
तैवानवरून बिहारच्या बोधगया येथे फिरायला आलेल्या महिलेचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. सध्या कोरोनाचे नवनवीन व्हेरिएंट समोर येत असल्याने आरोग्य विभागाने या प्रकरणाची अत्यंत गांभीर्याने दखल घेतली आहे. या महिलेला आता आयसोलेट करण्यात आले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, चिओ एओ असं या 42 वर्षीय महिलेचं नाव आहे. महिला पाच दिवसांआधी बोधगया या ठिकाणी फिरण्यासाठी आली होती. तिची आरटीपीसीआर टेस्ट करण्यात आली. त्यामध्ये तिचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. यानंतर तिला एका खोलीत आयसोलेट करण्यात आलं आहे.
आरोग्य विभागाने कोरोना पॉझिटिव्ह महिलेच्या संपर्कात आलेल्या सर्वांची रॅपिड अँटीजन टेस्ट केली आहे. दिलासादायक बाब म्हणजे संपर्कात असलेल्या सर्वांची कोरोना रिपोर्ट निगेटिव्ह आली आहे. बोधगया येथे बौद्ध धर्माचे अनुयायी आणि अनेक विदेशी पर्यटक हे येत असतात. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. जगभरात कोरोनाचा कहर पाहायला मिळत आहे. नवनवीन व्हेरिएंटने टेन्शन वाढवलं आहे. प्रगत देश कोरोनापुढे हतबल झाले असून काही ठिकाणी गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे. ओमायक्रॉननंतर आता त्याचा सब व्हेरिएंट ओमायक्रॉन बीए 2 थैमान घातले आहे. आशिया आणि युरोपमधील बहुतांश देशांमध्ये कोरोनाच्या नवीन रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ होत आहे.
बापरे! फक्त फुफ्फुसांवर नाही तर शरीरातील 'या' अवयवावर अटॅक करतो ओमायक्रॉनचा BA.2 व्हेरिएंट
कोरोनाची चौथी लाट कधीही येऊ शकते, अशी भीती व्यक्त केली जात आहे. याबाबत तज्ज्ञ वेगवेगळे दावे करत आहेत. ओमायक्रॉनच्या सब व्हेरिएंट आता पोटावर अटॅक करत असल्याचं समोर आलं आहे. फुफ्फुसाऐवजी शरीराच्या इतर भागांसाठी, प्रामुख्याने पोटासाठी घातक ठरू शकतो, असं म्हटलं जात आहे. कोरोनाच्या चौथ्या लाटेआधी त्यासाठी कारणीभूत ठरणाऱ्या कोरोनाच्या नव्या व्हेरिएंटच्या लक्षणांबाबत तज्ज्ञांनी अलर्ट केलं आहे. तज्ज्ञांनी दावा केला आहे, बीए.2 हा व्हायरस फुफ्फुसाऐवजी पोटावर हल्ला करतो. या व्हायरसची लागण झाल्यास पोटात दुखणं, मळमळ आणि जुलाब यांसारखी लक्षणं दिसतील. लोकांनी अशी लक्षणं दिसल्यास खबरदारी घ्यावी आणि तब्येत जास्त बिघडल्यास डॉक्टरांना सल्ला घ्यावा असं आवाहन करण्यात आलं आहे.