नवी दिल्ली - देशात कोरोनाने थैमान घातले आहे. रुग्णांच्या संख्येने प्रशासनाच्या चिंतेत भर पडली आहे. याच दरम्यान अनेक धक्कादायक घटना समोर येत आहेत. तेलंगणात एका शाळेतील शिक्षिकेला कोरोनामुळे आपला जीव गमवावा लागला आहे. संध्या असं या शिक्षिकेचं नाव असून त्यांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. त्यांनी निवडणूक केंद्रावर ड्युटी केल्यानंतर त्यांना कोरोनाची लागण झाली. नागार्जुनसागर विधानसभा पोटनिवडणुकीसाठी शिक्षकांना निवडणूक ड्युटीवर बोलावण्यात आले होते. त्यानंतर काही दिवसांनी त्यांचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आणि उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. संध्या यांच्या पतीने निवडणुकांमुळे कुटुंब उद्ध्वस्त झाल्याचं म्हटलं आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, संध्या यांना एक आठ वर्षांची मुलगी आहे. राजकारण आणि निवडणुकांच्या दरम्यान कोरोना व्हायरसमुळे कुटुंब उद्ध्वस्त झालं असा गंभीर आरोप संध्या यांचे पती कमनपत्ती मोहन राव यांनी केला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, 20 एप्रिल रोजी संध्या यांची कोरोना चाचणी पॉझिटीव्ह आली होती. एका आठवड्यानंतर त्यांची तब्येत आणखी बिघडल्याने त्यांना हैदराबादच्या रुग्णालयातील आयसीयूमध्ये दाखल करण्यात आले. परंतु 8 मे रोजी त्यांचे निधन झाले. संध्या यांच्या अशा अचानक जाण्याने संपूर्ण कुटुंबाला मोठा धक्का बसला आहे.
"फक्त माझी पत्नीच नाही, तर माझा जीव गेला आहे. निवडणुका का झाल्या? फक्त एका आमदारासाठी इतक्या लोकांचा मृत्यू झाला. माझ्या पत्नीचा देखील मृत्यू झाला. माझे कुटुंब उद्ध्वस्त झाले. लॉकडाऊन किंवा लसीकरणानंतरही निवडणुका होऊ शकल्या असत्या. सर्वांचे लसीकरण झाल्यानंतर सुद्धा निवडणुका होऊ शकल्या असत्या. निवडणुका या लोकांच्या जीवनापेक्षा जास्त महत्त्वाच्या आहेत का?" असं संध्या यांच्या पतीने म्हटलं आहे. संध्या निवडणूक ड्युटीसाठी हलिया येथे गेल्या होत्या. तेथे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांनी दोन दिवसांपूर्वी एक प्रचंड जाहीर सभा घेतली. त्यानंतर मुख्यमंत्री, टीआरएस पक्षाचे उमेदवार आणि शेकडो लोक कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे दिसून आले होते.
तेलंगणा उच्च न्यायालयाने नुकतेच म्हटले आहे की, राज्यात विधानसभा पोटनिवडणुकीदरम्यान कोरोना संक्रमित झालेल्या सुमारे 500 शिक्षकांची ओळख पटवून त्यांना कोविड योद्धा म्हणून भरपाई द्यावी. सर्व संक्रमित शिक्षकांचे कुटुंब आता साथीच्या काळात निवडणुका घेण्याच्या सरकारच्या निर्णयावर प्रश्न विचारत आहे. तेलंगणा उच्च न्यायालयाने स्वत: या प्रकरणाची दखल घेतली आहे. राज्याचा हा "अपराध, निष्काळजीपणा" आहे. ज्यामुळे निवडणुकीच्या वेळी 15 शिक्षकांचा मृत्यू झाला. तर शेकडोजण कोरोना पॉझिटिव्ह झाले आहेत. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.