नवी दिल्ली - देशातील कोरोनाग्रस्तांची संख्या वाढली असून रुग्णांचा आकडा 3,32,36,921 वर पोहोचला आहे. गेल्या 24 तासांत कोरोनाचे 28,591 नवे रुग्ण आढळून आले आहेत. तर 338 जणांचा मृत्यू झाला आहे. कोरोनामुळे आतापर्यंत देशभरात तब्बल 4,42,655 लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. देश सध्या कोरोनाच्या महाभयंकर संकटाचा सामना करत आहे. याच दरम्यान आरोग्य विभागाचा भोंगळ कारभार समोर आला असून रुग्णालयातील स्टाफचा मोठा निष्काळजीपणा पाहायला मिळाला आहे. एकाचवेळी दोनदा कोरोना लसीचा डोस दिल्याने महिलेची प्रकृती बिघडल्याची माहिती मिळत आहे. यामुळे आरोग्य विभागात एकच खळबळ उडाली आहे.
रायबरेलीच्या महाराजगंजच्या कैर गावामध्ये एका 41 वर्षीय महिलेला कोरोना लसीचे दोन डोस हे एकाच दिवशी देण्यात आल्याची घटना समोर आली आहे. या घटनेनंतर महिलेची प्रकृती ही अचानक बिघडली आणि उपचारासाठी तिला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तर दुसरीकडे आरोग्य विभागाने हा आरोप फेटाळून लावला आहे. हे अशक्य असल्याचं म्हटलं आहे. उपजिल्हाअधिकारी सविता यादव यांनी ही घटना एक अफवा असल्याचं म्हटलं आहे. मिळालेल्या माहितीनुसार, कैर या गावात राहणाऱ्या केशवती या कोरोना लस घेण्यासाठी गेल्या होत्या.
आरोग्य विभागात खळबळ
आधार कार्ड दिल्यानंतर दोनदा कोरोना लस देण्यात आल्याचं केशवती यांनी म्हटलं आहे. यानंतर त्यांची प्रकृती ही अचानक बिघडली. त्यांच्या कुटुंबीयांनी त्यांना उपचारासाठी तातडीने रुग्णालयात दाखल केलं असून सध्या त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. या प्रकरणी आरोग्य विभागाच्या कर्मचाऱ्यांवर हलगर्जीपणाचा आरोप करण्यात येत आहे. तसेच ही घटना सोशल मीडियावर जोरदार व्हायरल झाल्याने एकच खळबळ उडाली आहे. अधिकाऱ्यांनी एकदाच लस दिल्याचं म्हणत आपल्यावरील आरोप फेटाळून लावला आहे. सध्या याचा अधिक तपास करण्यात येत आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.
लसीकरण देखील वेगाने सुरू आहे. लसीचे दोन डोस घेतलेल्यांसाठी आता खूशखबर आहे. कोरोनामुळे होणाऱ्या मृत्यूचा धोका तब्बल 11 पटीने कमी असल्याचा तज्ज्ञांचा दावा आहे. अमेरिकेच्या अधिकाऱ्यांनी याबाबत माहिती दिली आहे. रुग्णालयात भरती होण्याचा धोका देखील कमी झाला आहे. काही दिवसांपूर्वी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ज्यो बायडन यांनी देशामध्ये एका एक्शन प्लॅनची घोषणा केली असून लसीकरणासंदर्भात काही निर्देश जारी केले आहेत. अमेरिकेच्या आरोग्य अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, लसीकरण पूर्ण झालेल्या लोकांना रुग्णालयात भरती होण्याची शक्यता ही 10 पटीने कमी झाली आहे. तर मृत्यूचा धोका 11 पटीने कमी झाला आहे. सेंटर्स फॉर डिसीज कंट्रोल अँड प्रिव्हेन्शनच्या वतीने तीन नवीन पेपर जारी करण्यात आले आहेत. यामधील एका पेपरमध्ये याबाबत महत्त्वाची माहिती देण्यात आली आहे.