एस. के. गुप्तानवी दिल्ली : कोरोनाबाधितांच्या वाढत्या आकडेवारीने पुन्हा एकदा चिंतेत भर घातली आहे. गेल्या २४ तासांत देशभरात ६२ हजार २७६ कोरोनाबाधितांची भर पडली असून २९१ जणांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. महाराष्ट्रातील परिस्थिती अधिकच गंभीर असून देशभरातील ४६ सर्वाधिक संक्रमित जिल्ह्यांपैकी २५ जिल्हे एकट्या महाराष्ट्रातील आहेत. या पार्श्वभूमीवर केंद्रीय आरोग्य सचिव राजेश भूषण यांनी शनिवारी महाराष्ट्रासह १२ राज्यांच्या सचिवांची बैठक घेतली.
कोरोनाबाधितांची सातत्याने वाढत असलेली संख्या चिंताजनक असून फेब्रुवारीच्या मध्यापासून देशभरात बाधितांच्या संख्येत झपाट्याने वाढ होऊ लागली आहे. गेल्या २४ तासांत देशात ६२ हजार २७६ कोरोनाबाधितांची नोंद झाली. त्यात सर्वाधिक वाटा महाराष्ट्राचा - ३६ हजार ९०२ - होता. शुक्रवारी महाराष्ट्रात नोंद झालेला बाधितांचा आकडा गेल्या वर्षी ११ सप्टेंबर रोजी नोंद झालेल्या बाधितांच्या दीडपट होता. ११ सप्टेंबर रोजी महाराष्ट्रात २४ हजार ८८६ बाधितांची नोंद झाली होती. महाराष्ट्रातील हा आकडा केंद्रीय यंत्रणांची चिंता वाढवणारा आहे.
होळी सणाच्या पार्श्वभूमीवर कोरोनापासून बचाव करण्यासाठी लोकांनी नियमांचे काटेकर पालन करायला हवे. कोरोना संसर्गाची साखळी तोडण्यासाठी अधिकाधिक चाचण्या आणि लसीकरणाचा वेग वाढविण्याचे आदेश देण्यात आले आहेत. - डॉ. हर्षवर्धन, केंद्रीय आरोग्य मंत्री
राज्यातील बाधित जिल्हे पुणे, नागपूर, मुंबई, मुंबई उपनगरे, ठाणे, नाशिक, अहमदनगर, अकोला, औरंगाबाद, बीड, बुलडाणा, जळगाव, जालना, लातूर, नंदुरबार, नांदेड, उस्मानाबाद, पालघर, परभणी, रायगड, सांगली, सोलापूर, वर्धा आणि यवतमाळ.