चैन्नई - देशातील कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी संपूर्ण देशभरात सु्मारे सव्वा दोन महिने लॉकडाऊन सुरू होते. दरम्यान, १ जूनपासून देश अनलॉक करण्याची प्रक्रिया सुरू झाल्यापासून देशात कोरोनाच्या रुग्णांचे प्रमाण मोठ्या संख्येने वाढले आहे. काही शहरांमध्ये तर कोरोनाच्या संसर्गाने चिंताजनक रूप धारण केले आहे. दरम्यान, कोरोनाच्या वाढत्या रुग्णांच्या पार्श्वभूमीवर देशातील एका महानगरात पुन्हा एकदा लॉकडाऊन लागू करण्याची वेळ आली आहे.
कोरोनाचा फैलाव चिंताजनक पातळवीर पोहोचल्याने तामिळनाडू सरकारने चेन्नईसह चार जिल्ह्यांत पुन्हा एकदा लॉकडाऊन केले आहे. या जिल्ह्यांमध्ये १९ ते ३० जूनदरमम्यान लॉकडाऊन लागू राहणार आहे. चेन्नई, कांचीपुरम, चेंगलटपट्टू आणि तिरवल्लूर या मेट्रोपोलिटीन चेन्नई पोलीसांच्या हद्दील येणाऱ्या भागांमध्ये हे लॉकडाऊन लागू राहणार आहे. लॉकडाऊनमधील सक्तीही वाढवण्यात येणार असल्याचे स्पष्ट संकेत देण्यात आले आहेत.
तामिळनाडूचे मुख्यमंत्री ई. के. पलानीसामी यांनी १९ ते ३० जूनदरम्यान लागू होणाऱ्या या लॉकडाऊनला मॅक्सिमाईझ रेस्ट्रिक्टेड लॉकडाऊन असे नाव दिले आहे. त्यातून या जिल्ह्यात लॉकडाऊन वाढवण्यात आल्याचे तसेच निर्बंध अधिक कठोर करण्यात आल्याचे संकेत मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत. तामिळनाडू हे सध्या देशातील कोरोनाचा सर्वाधिक संसर्ग झालेल्या राज्यांच्या यादीत दुसऱ्या स्थानावर आहे.
तामिळनाडूमधील केवळ चेन्नई या शहरात कोरोनाबाधितांचा आकडा ३० हजारांच्या वर पोहोचला आहे. तामिळनाडूमध्ये सद्यस्थितीत दरदिवशी कोरोनाचे दोन हजार नवे रुग्ण सापडत आहेत. राज्यात आतापर्यंत कोरोनाचे ४४ हजार ६६१ रुग्ण सापडले असून, ४३५ जणांचा मृत्यू झाला आहे. तर आतापर्यंत २४ हजार ५४७ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. तामिळनाडूमधील कोरोनाचे सर्वाधिक रुग्ण हे चेन्नई आणि आसपासच्या भागात आहेत. ही बाब विचारात घेत या भागात लॉकडाऊन लागू करण्यात आले आहे.
इतर महत्त्वाच्या बातम्या