कोरोना विषाणूविरुद्धच्या लढाईचा भाग म्हणून देशभरात सध्या लॉकडाऊन 2.0 सुरू आहे. त्यानंतर 4 मे ते 17 मे या काळात लॉकडाऊन 3.0 चीही घोषणा केंद्रीय गृह मंत्रालयानं आजच केली आहे. त्यात ग्रीन आणि ऑरेंज झोनमध्ये महत्त्वाच्या व्यवहारांना परवानगी देण्यात आल्यानं नागरिक आणि छोट्या व्यावसायिकांना दिलासा मिळाला आहे. त्याचवेळी, लॉकडाऊनमुळे घरापासून दूर अडकून पडलेल्या मजूर, विद्यार्थी, पर्यटकांनाही मोदी सरकारनं मोठा आधार दिला आहे. भारतीय रेल्वे त्यांच्यासाठी संकटमोचक म्हणून धावून आली आहे.
आंतरराष्ट्रीय कामगार दिनाचं औचित्य साधून केंद्रीय गृह मंत्रालयानं आज 'श्रमिक स्पेशल ट्रेन' सुरू करण्याचा निर्णय जाहीर केला. मजूर, विद्यार्थी, पर्यटक, तीर्थस्थळांवर अडकलेले यात्रेकरू या विशेष ट्रेनने घरी पोहोचू शकणार आहेत. त्यापैकी एक ट्रेन तेलंगणामधील लिंगमपेल्ली येथे अडकलेल्या परप्रांतीय मजुरांना घेऊन पहाटे पाच वाजता झारखंडकडे रवानाही झाली आहे. या ट्रेनमधून एकूण १२०० मजूर प्रवास करत आहे. ही ट्रेन रात्री ११ वाजता झारखंडमधील हातिया येथे पोहोचेल.
नाशिकहून सुटणार ट्रेन
याशिवाय, आणखी पाच मार्गांवर 'श्रमिक विशेष ट्रेन' धावणार आहेत. त्यात नाशिकहून दोन ट्रेन सुटतील. त्यापैकी एक लखनऊच्या दिशेन, तर दुसरी भोपाळला जाणार असल्याची माहिती ANI वृत्तसंस्थेनं दिली आहे. नाशिकमध्ये प्रशासनानं वेगवेगळ्या ठिकाणी शेकडो मजुरांना क्वारंटाईन केलं आहे. त्यापैकी मध्य प्रदेशातील 360 जणांना आज रात्री विशेष ट्रेनने सोडलं जाणार आहे. त्यादृष्टीने नाशिक रोड स्टेशनवर पोलीस बंदोबस्तात वाढही करण्यात आली आहे. नाशिक रोड स्टेशनातून सहा डब्यांची गाडी भोपाळसाठी सुटेल. प्रत्येक डब्यात 52 प्रवासी असतील आणि फिजिकल डिस्टन्सिंगचं काटेकोर पालन केलं जाईल, असं रेल्वे अधिकाऱ्यांनी स्पष्ट केलं.
त्यासोबतच, अलुवा ते भुवनेश्वर, जयपूर ते पाटणा, कोटा ते हटिया या तीन मार्गांवरही विशेष ट्रेन धावतील. या ट्रेन नेमक्या कधी सुटणार, याबद्दल अद्याप रेल्वे अधिकाऱ्यांकडून माहिती मिळू शकलेली नाही.
प्रवाशांची तपासणी होणार!
मजूर, विद्यार्थी, पर्यटकांना विशेष ट्रेनमधून आपल्या गावी नेण्याआधी त्यांची पूर्ण तपासणी केली जाणार आहे. कोरोनाची कुठलीही लक्षणं नाहीत ना, याची खातरजमा केल्यानंतरच त्यांना ट्रेनमध्ये प्रवेश दिला जाणार आहे. तसंच, पूर्ण प्रवासात त्यांनी मास्क वापरणं बंधनकारक असेल. या मजूर-विद्यार्थ्यांच्या जेवणाची आणि पाण्याची व्यवस्था राज्य सरकारने करायची आहे.
रेल्वे आणि संबंधित राज्य सरकारांनी या ट्रेन प्रवासाच्या समन्वयासाठी आपल्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची नोडल अधिकारी म्हणून नियुक्ती करण्याच्या सूचनाही देण्यात आल्या आहेत.
रेल्वे स्टेशनांवर स्क्रीनिंग
विशेष ट्रेनने आपल्या राज्यात पोहोचलेल्या मजूर-विद्यार्थी-पर्यटकांना संबंधित राज्य सरकार उतरवून घेईल आणि रेल्वे स्टेशनवरच त्यांची तपासणी करेल. गरज वाटल्यास या प्रवाशांना क्वारंटाईनही केलं जाईल. त्यामुळे, मजूर-विद्यार्थ्यांची ने-आण करताना कोरोनाचा संसर्ग टाळण्याच्या दृष्टीने योग्य ती खबरदारी घेतली जाणार आहे.
संबंधित बातम्या
देशातील लॉकडाऊन आणखी दोन आठवड्यांनी वाढवला, केंद्रीय गृह मंत्रालयाकडून घोषणा
लॉकडाऊन वाढला, पण 'ग्रीन झोन'ला दिलासा; 'ऑरेंज झोन'मध्येही काही व्यवहार सुरू होणार
देशात 75,000 व्हेंटिलेटर्सची आवश्यकता, कोरोनाग्रस्तांची संख्या 35,043 वर
केंद्राकडून झोन्सची यादी जाहीर; बघा तुमचा जिल्हा कोणत्या झोनमध्ये