कोरोनाचे संकट दिवसेंदिवस वाढत असून, याचा सर्वाधिक फटका हा रोजंदारीवर काम करणा-या कामगारांना बसत आहे. दिवसेंदिवस कोरोनामुळे दगावणा-यांच्या संख्येत देखील वाढ होत असताना एक हृदय पिळवटून टाकणारी घटना समोर आली आहे. लुधियानामध्ये दद्दन नावाच्या मजुराच्या गर्भवती पत्नीचा कोरोनामुळे मृत्यू झाला. मात्र अंत्यसंस्कार करण्यासाठी कोणीही त्याच्या मदतीसाठी पुढे आले नाही. मृत पत्नीला 1137 किमी लांब बलरामपूर गावात नेण्यासाठी लॉकडाऊनमध्येच या मजुराला लोकांकडून २७ हजार रुपयांचे कर्ज घ्यावे लागले होते. अखेर २० तास प्रवास करत अंत्यसंस्कारासाठी तो पत्नीला गावी घेऊन गेला.
सनातन परंपरेच्या मान्यतेनुसार, कोणी मृत व्यक्तीला खांदा दिल्यास त्याला पुण्य मिळते. मात्र कोरोनामुळे ही मान्यताच पूर्णतः बदलून गेली आहे. माणुसकी संपली की काय असा प्रश्न वारंवार उपस्थित होतो. कोणतीही व्यक्ती त्याच्या मदतीसाठी पुढे आली नाही. परिस्थिती समोर हतबल झालेला दद्दनला अखेर आपल्या तीन मुलांसह मृत पत्नीचे गावी अंत्यसंस्कार करावे लागले. दद्दन हा लुधियानामध्ये कामानिमित्त आपल्या कुटुंबासह राहत होता. पत्नीची अचानक तब्येत खराब झाल्यामुळे त्याने पत्नीला रुग्णालयात दाखल केले.
उपचारादरम्यानच पत्नी गीताचे निधन झाले. कोरोनाचे निदान झाल्यानंतर चार दिवसानंतर मृतदेह दद्दनला सोपवला. चार दिवस मुलांसह दद्दन हॉस्पिटल ते घर फे-या मारत राहिला. लॉकडाऊनमुळे आर्थिक अडचणीत सापडलेला दद्दनकडे कोणताच पर्याय नव्हता अखेर त्याने पत्नीचे अंत्यसंस्कार आपल्या गावी केले. आरोग्य विभागाने दद्दन आणि मुलांना सध्या क्वॉरंटाईन केले आहे.