नवी दिल्ली : देशात कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी ३ मेपर्यंत लॉकडाऊन सुरु आहे. या लाकडाऊन दरम्यान लोकांच्या मदतीसाठी म्हणजेच आवश्यक सेवेसाठी सरकारने हेल्पलाइन नंबर सुरु केला आहे. मात्र, या हेल्पलाइन नंबरवर काही लोक कॉल करुन रसगुल्ला, सामोसे, पान आणि गुटखा यांसारख्या वस्तूंची मागणी करत आहेत.
अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार, मुख्यमंत्री हेल्पलाइन नंबर १०७६ हा लोकांना औषधे आणि रेशन पोहोचविण्यासाठी मदत करत आहे. लखनऊ येथील उच्च रक्तदाब असलेल्या राम रतन पाल या व्यक्तीने हेल्पलाइन नंबरवर कॉल करून सांगितले की, औषधे संपली आहेत. त्यानंतर त्यांना लवकरात लवकर औषधे पाठविण्याची सोय केली. अशाच प्रकारे गौतमबुद्धनगरमध्ये शंकर सिंह या नावाच्या व्यक्तीने रेशनसाठी फोन केला. त्यांनाही अधिकाऱ्यांमार्फत रेशन पोहोचविले. आतापर्यंत गरजूंना मुख्यमंत्री हेल्पलाइन नंबरवरून लाखांहून अधिक लोकांना मदत पोहोचविली आहे. मात्र, काही लोक या हेल्पलाइन नंबरवर कॉल करुन विचित्र मागणी करत आहेत.
राज्य पोलिसांच्या हेल्पलाइन नंबरवर अलीकडेच एक फोन आला. ज्यामध्ये एका वयस्कर व्यक्तीने रसगुल्ला मिठाईची मागणी केली. प्रथम पोलिसांना हा विनोद वाटला, परंतु जेव्हा राजधानीच्या हजरतगंज भागातील एक पोलीस त्या ऐंशी वर्षांच्या व्यक्तीला रसगुल्ला देण्यासाठी पोहोचले, तेव्हा त्यांना समजले की खरोखरच त्यांना रसगुल्लाची गरज होती. कारण, त्यांना मधुमेहाचा त्रास जावणत होता आणि त्यांच्या रक्तातील साखरेची पातळी अचानक कमी झाली होती.
अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, हेल्पलाइनद्वारे काही लोकांनी मागितलेल्या काही वस्तू इतक्या महत्त्वाच्या नसतात. काही लोकांनी पोलीस हेल्पलाइननंबर 112 वर फोन केले आणि पान, गुटखा आणि चटणीसह गरम सामोसेची मागणी केली. एकाला सामोसे पोहोचविले, पण ज्याने सामोसे मागितले, त्याला पोलीस ठाण्यात बोलाविले आणि त्याला जवळील नाला साफ करण्यास सांगितले. त्याचप्रमाणे रामपूरमध्ये पोलीस हेल्पलाइन नंबरवर कॉल करून पिझ्झाची मागणी केली. त्यानंतर पोलिसांनी त्यालाही शिक्षा केली.
काही ठिकाणी अशीही बातमी आली की मुलांनी पोलिसांना फोन केला आणि चिप्स, केक आणि आईस्क्रीम इत्यादींची मागणी केली. 112 पोलीस हेल्पलाइनचे एडीजी असीम अरुण यांनी सांगितले की, 'लॉकडाउन सुरू झाल्यापासून 112 नंबरवर आलेल्या फोननुसार, आतापर्यंत लाखों लोकांना जेवण, औषधे इत्यादी सुविधा उपलब्ध केल्या आहेत. याशिवाय फोन कॉलशिवायही हजारो लोकांना मदत केली जात आहे.'
ते म्हणाले, 'जवळपास १,१०० पोलीस कर्मचारी ११२ नंबरवर आलेला कॉल घेतात. तर राज्यभरातील 35 हजार पीआरव्हीवर (पोलिस वाहनांवर) हजारो पोलीस कर्मचारी चोवीस तास कार्यरत आहेत. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सुरु असलेल्या लॉकडाऊन दरम्यान सामान्य लोकांच्या दारात जाऊन मदत केली जात आहे.'