नवी दिल्ली - कोरोनाने जगभरात थैमान घातले असून भारतातील कोरोनाग्रस्तांची संख्या ही दिवसागणिक वाढत आहे. भारतात कोरोनामुळे आतापर्यंत 300 हून अधिक जणांना आपला जीव गमवावा लागला असून कोरोनाग्रस्तांची संख्या ही 9352 हून अधिक झाली आहे. कोरोनाला रोखण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशात 21 दिवसांच्या लॉकडाऊनची घोषणा केली आहे. मात्र कोरोनाचा प्रादुर्भाव कमी न होता वाढतच असल्याने देशभरात लॉकडाऊन वाढवण्याचा विचार केंद्र सरकार करत असल्याचे बोलले जात आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आज सकाळी 10 वाजता देशाला संबोधित करणार आहेत. याच दरम्यान काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी मोदींना सल्ला दिला आहे.
देशाला स्मार्ट उपायांची गरज असल्याचा सल्ला राहुल गांधी यांनी नरेंद्र मोदींना दिला आहे. तसेच पंतप्रधानांनी देशातल्या गरीब लोकांसाठी मोठ्या आर्थिक पॅकेजची घोषणा करावी अशी मागणी केली आहे. लॉकडाऊन हे गरिबांसाठी मोठं संकट ठरलं आहे. शेतकरी आपला माल विकू शकत नाही. मजुरांचे हाल होत आहेत. अशा पार्श्वभूमीवर देशाला स्मार्ट उपायांची गरज असल्याचं राहुल यांनी म्हटलं आहे. राहुल यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून याबाबत ट्विट केलं आहे.
शेतीपासून बाजारापर्यंत माल पोहोचवताना शेतकऱ्यांच्या नाकीनऊ येत आहेत. काही दिवसांपूर्वी शेतकऱ्यांसाठी राहुल गांधी यांनी आवाज उठवला होता. तसेच शेतकऱ्यांच्या हितासाठी लॉकडाऊन शिथिल करण्याची मागणी केली होती. लॉकडाऊन सुरक्षितरीत्या काढणं शेतकऱ्यांसाठी आवश्यक आहे. रब्बी हंगामातील पिकं शेतात उभी राहिलेली असून, लॉकडाऊनपायी कापणीचे काम कठीण झाले आहे. यामुळे शेकडो शेतकर्यांची उपजीविका धोक्यात आली असल्याचं त्यांनी म्हटलं होतं.
काँग्रेसच्या अंतरिम अध्यक्षा सोनिया गांधी यांनी देशवासियांना संदेश दिला आहे. सोनिया गांधी यांनी त्यांच्या ट्विटरवर व्हिडीओ पोस्ट करत लोकांना शांतता आणि संयम बाळगण्याची विनंती केली आहे. तसेच कोरोनाशी लढणाऱ्या आरोग्य सेवकांचे आभार मानले आहेत. याचबरोबर काँग्रेसचा प्रत्येक कार्यकर्ता देशवासियांची मदत करण्यास तयार असल्याचं म्हटलं आहे. ''माझ्या प्रिय देशवासियांने, तुम्हा सर्वांना नमस्कार! कोरोनाच्या या संकटात तुम्ही तुमच्या घरामध्ये सुरक्षित असाल अशी आशा करते. सर्वात आधी या संकटात शांतता, धीर आणि संयम बाळगल्याने जनतेचे आभार मानते. तुम्ही लॉकडाऊनच्या नियमांचे पालन करत आहात अशी आशा करते. घरामध्ये रहा, वेळोवेळी हात धुवा. खूपच गरज असेल तरच घराबाहेर पडा. यावेळी मास्क, ओढणी लावून या लढाईमध्ये सहकार्य करावे, असं सोनियांनी म्हटलं आहे.
महत्त्वाच्या बातम्या
जनतेला सवलती मिळण्याच्या शक्यता, आजच्या भाषणाकडे देशाचे लक्ष
खासगी कोरोना चाचण्या आता फक्त गरिबांसाठीच, न्यायालयाचा नवा आदेश