नवी दिल्ली: कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी देशात सुरू असलेला लॉकडाऊन आणखी दोन आठवड्यांनी वाढवण्यात आला आहे. १७ मेपर्यंत देशातील लॉकडाऊन कायम राहील. या काळात कोरोना रुग्णांची संख्या जास्त असलेल्या रेड झोनमध्ये लागू असलेले निर्बंध तसेच राहतील. मात्र ग्रीन आणि ऑरेंज झोनमधील नागरिकांना दिलासा मिळणार आहे. ऑरेंज झोनमध्ये काही सवलती दिल्या जाणार असून ग्रीन झोनमधील आर्थिक व्यवहार आणि उद्योग मोठ्या प्रमाणात सुरू होतील. गृह मंत्रालयानं दिलेल्या आदेशांनुसार, ग्रीन झोनमध्ये बससेवा सुरू करण्यात येईल. मात्र या बसेस ५० टक्के क्षमतेनंच चालवल्या जातील. बस आगारांमध्ये ५० टक्क्यांपेक्षा जास्त कर्मचारी नसतील. ऑरेंज झोनमधल्या बससेवा सुरू केल्या जाणार नाहीत. मात्र या भागांमध्ये कॅब सुरू करण्यास परवानगी देण्यात आली आहे. कॅबमध्ये चालकासोबत केवळ एकच प्रवासी असेल. ऑरेंज झोनमधल्या औद्योगिक सेवा सुरू होतील. औद्योगिक संकुलंदेखील सुरू करण्यास परवानगी दिली गेली आहे. मात्र रेड झोनमधील निर्बंध कायम राहतील. या ठिकाणी असलेली दुकानं सुरू होणार नाहीत. केवळ जीवनावश्यक वस्तूंची विक्री करणारी दुकानं खुली राहतील.
Coronavirus Lockdown: लॉकडाऊन वाढला, पण 'ग्रीन झोन'ला दिलासा; 'ऑरेंज झोन'मध्येही काही व्यवहार सुरू होणार
By ऑनलाइन लोकमत | Published: May 01, 2020 7:01 PM