नवी दिल्ली : कोरोना व्हायरसचा सामना करतानाच लॉकडाउनने प्रभावित झालेल्या अर्थव्यवस्थेला फुंकर घालण्यासाठी आता दुसरे प्रोत्साहन पॅकेज जाहीर करण्याची तयारी सुरू झाली आहे. यासंदर्भात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी, गृहमंत्री अमित शाह, अर्थमंत्री निर्मला सीतारमण, तसेच वित्त मंत्रालयातील काही बड्या अधिकाऱ्यांची बैठक घेतल्याचे सूत्रांकडून समजते.
एमएसएमई मंत्रालयाशीही बैठक -सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अमित शाह आणि निर्मला सीतारमण यांच्याशी बैठक केली आहे. यानंतर ते सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग (MSME) मंत्रालय, तसेच वित्त मंत्रालयातील काही मोठ्या अधिकाऱ्यांशीही बैठक करणार आहेत. आज सायंकाळी देशाच्या अर्थव्यवस्थेला गती देण्याच्या उद्देशाने अर्थमंत्रालय पंतप्रधानांसमोर एक सविस्तर प्रेझेंटेशनसह आपल्या प्लॅनसंदर्भात माहिती देणार आहे.
गुंतवणूक आकर्षित करण्यावर चर्चा -पंतप्रधानांनी नागरिक उड्डाण, कामगार आणि ऊर्जा मंत्रालयाशी शुक्रवारीच बैठक केली आहे. अर्थव्यवस्था लवकरात लवकर पट्रीवर आणण्यासाठी स्थानिक तसेच परदेशी गुंतवणुकीला आकर्षित करण्यासाठी पंतप्रधानांनी यापूर्वीच अर्थ तसेच एमएसएमई मंत्रालयाशी सविस्तर चर्चा केली आहे. या बैठकांमध्ये गृहमंत्र्यांबरोबरच अर्थमंत्रीही उपस्थित होते.
यापूर्वी केली होती 1.7 लाख कोटींची घोषणा -लॉकडाउनमुळे प्रभावित झालेल्या गरिबांसाठी मोदी सरकारने यापूर्वी 1.7 लाख कोटी रुपयांच्या पॅकेजची घोषणा केली होती. यात, मोफत धान्य वितरण, घरगुती गॅस वितरण, तसेच गरीब महिला आणि वृद्धांसाठी आर्थिक मदतीचा समावेश होता. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, आता सरकार पुन्हा गरिबांसाठी तसेच भारतातील उद्योग धंद्यांसाठी दुसऱ्यांदा मदत म्हणून पॅकेजच्या घोषणेवर विचार करत आहे.
लॉकडाउनमुळे आर्थिक व्यवहार ठप्प -सरकारने पहिल्या टप्प्यात 25 मार्च ते 14 एप्रिलपर्यंत 21 दिवसांच्या लॉकडाउनची घोषणा केली होती. यानंतर परत लॉकडाउनची तारीख वाढवून 3 मे करण्यात आली. आता परत दोन आठवड्यांनी लॉकडाउन वाढवून 17 मेपर्यंत करण्यात आला आहे. यामुळे दुकाने, कारखाने, रेल्वे तसेच विमानसेवेसह सर्वच प्रकारचे आर्थिक व्यवहार ठप्प झाले आहेत.