जालंदर: तपासणीसाठी कार रोखणाऱ्या पोलीस अधिकाऱ्याला बोनेटवर टाकून गाडी पुढे दामटवल्याचा धक्कादायक प्रकार पंजाबच्या जालंदरमध्ये घडला आहे. लॉकडाऊन असल्यानं पोलीस अधिकाऱ्यानं कार थांबवण्यास सांगितली. त्यावेळी कारच्या चालकानं कार न थांबवता ती पुढे चालवत नेली. त्यामुळे कारसमोर असलेला पोलीस अधिकारी थेट बोनेटवर पडला. यानंतरही चालक थांबला नाही. त्यानं काही अंतर कार पुढे नेली. आसपासच्या लोकांनी बराच आरडाओरडा केल्यानंतर चालक थांबला. त्याला पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. मिल्कीबार चौकात हा प्रकार घडला.'मिल्कीबार चौकात आलेल्या एका कारला थांबण्याची सूचना करण्यात आली. मात्र चालक थांबला नाही. त्यावेळी सहाय्यक वरिष्ठ निरीक्षक मुल्कराज कर्तव्यावर होते. चालकानं कार न थांबवल्यानं त्यांनी जीव वाचवण्यासाठी बोनेटवर उडी मारली. चालकानं त्याही परिस्थितीत कार काही अंतर पुढे नेली. अनेकांनी आरडाओरडा केल्यामुळे आणि कारच्या मागे धाव घेतल्यानं चालकानं कार थांबवली. कार चालकाला ताब्यात घेण्यात आलं असून घटनेची चौकशी सुरू आहे,' अशी माहिती पोलीस अधिकारी सुरजीत सिंग यांनी दिली.
VIDEO: धक्कादायक! गाडी रोखणाऱ्या पोलिसाला बोनेटवर टाकून 'तो' सुस्साट सुटला अन्...
By ऑनलाइन लोकमत | Published: May 02, 2020 12:21 PM