बंगळुरू - कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी सर्वात प्रभावी उपाय म्हणून सुरुवातीच्या काळात लॉकडाऊन करण्याचा उपाय जगातील अनेक देशांनी लागू केला होता. भारतातही मार्च महिन्याच्या उत्तरार्धापासून मे महिन्याच्या अखेरपर्यंत लॉकडाऊन लागू करण्यात आले होते. तसेच आताही कोरोना रुग्णांची वेगाने वाढ होत असलेल्या शहरांमध्ये अधूनमधून लॉकडाऊन लागू केले जात आहे. दरम्यान, लॉकडाऊन हा काही कोरोनावरील उपाय असू शकत नाही, असे विधान कर्नाटकचे मुख्यमंत्री बी.एस. येडियुरप्पा यांनी केले आहे.
राज्यात वाढत असल्याच्या पार्श्वभूमीवर कर्नाटकचे मुख्यमंत्री बी. एस. येडियुरप्पा यांनी काल राज्यातील जनतेशी सोशल मीडियाच्या माध्यमातून संवाद साधला. त्यावेळी येडियुरप्पा म्हणाले की, ‘’सुरुवातीच्या काळामध्ये आम्ही कोरोनावर नियंत्रण ठेवण्यात यशस्वी ठरलो. मात्र गेल्या काही दिवसांत खासकरून बंगळुरूमध्ये कोरोनाचे रुग्ण वाढले आहेत. मात्र लॉकडाऊन हा काही कोरोनावरील उपाय असू शकत नाही. राज्याचा आर्थिक गाडा चालवण्यासाठी आर्थिक साधने जमवणे हेसुद्धा तितकेच गरजेचे आहे. कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी जनतेने सोशल डिस्टंसिंग पाळणे तसेच मास्क वापरणे गरजेचे आहे.’’दरम्यान, बंगळुरू आणि अन्य शहरांध्ये लॉकडाऊन वाढवण्यात येणार नसल्याचेही येडियुरप्पा यांनी स्पष्ट केले आहे.
‘’जर कोरोना विषाणूला हरवायचे असेल तर आपल्याला दिलेल्या सूचनांचे पालन करावे लागेल. तसेच नियमांचा भंग करणाऱ्यांवर कारवाई करण्यात येईल. राज्य सरकार कोविड-१९ वर नियंत्रण मिळवण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करत आहे. मात्र बंगळुरूमध्ये तसेच कर्नाटकच्या कुठल्याही भागात आता लॉकडाऊन होणार नाही. तसेच जनतेला आपले दैनंदिन व्यवहार करण्याची परवानगी असेल. मात्र कंटेन्मेंट झोनमध्ये निर्बंध कायम राहतील,’’ असे येडियुरप्पा यांनी सांगितले. यावेळी येडियुरप्पा यांनी डॉक्टर, नर्स आणि अन्य आरोग्य कर्मचाऱ्यांचेही कौतुक केले.
कर्नाटकमध्ये गेल्या काही दिवसांत कोरोनाच्या रुग्णांची संख्या प्रचंड वेगाने वाढली आहे. मंगळवारी राज्यातील एकूण कोरोनाबाधितांचा आकडा ७१ हजार ०६९ वर पोहोचला होता. पैकी २५ हजार ४५९ जण आजारातून बरे झाले आहेत. तर राज्यात एक हजार ४६४ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. कोरोनाचे सर्वाधिक रुग्ण हे बंगळुरू शहर भागात सापडले आहेत. बंगळुरूमध्ये आतापर्यंत ३४ हजार ९४३ कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे.
इतर महत्त्वाच्या बातम्या
कोरोनावरील लस विकसित करण्याच्या शर्यतीत आहेत 'या' सात भारतीय कंपन्या, काहींनी घेतलीय संशोधनात आघाडी
coronavirus: धक्कादायक! कोरोनाच्या रिपोर्टमध्ये केले गोलमाल, डॉक्टर झाला मालामाल
भारतानंतर आता या देशाने चीनला दाखवली सैनिकी तादक, घुसखोरीला चोख प्रत्युत्तर देण्याचा दिला इशारा
महिंद्रांनी सुरक्षा दलांसाठी आणले दणकट चिलखती अस्र; आता माओवादी, दहशतवाद्यांची खैर नाही
…म्हणून भारतातील दहा पैकी तीन कोरोना रुग्ण करू शकत नाहीत प्लाझ्मा दान
coronavirus: कोरोनाबाधित रुग्णाचे तब्बल दीड कोटींचे बिल केले माफ, तिकीट देऊन केली मायदेशी पाठवणी