मंगळूरू - देशातील कोरोना व्हायरसचा वाढता प्रार्दुभाव रोखण्यासाठी संपूर्ण देशात 21 दिवस लॉकडाऊन करण्याची घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली. नागरिकांनी गरज नसल्यास घराच्या बाहेर न पडता स्वत:ची आणि कुटुंबाची काळजी घ्यावी असंही मोदींनी सांगितले. कोरोनाशी लढा देण्यासाठी सर्वांनीच आपली जबाबदारी ओळखावी असं नरेंद्र मोदी म्हणाले. कोरोना व्हायरसच्या सामना करण्यासाठी देश सज्ज झालेला असतानाच देशातील रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे. भारतातील कोरोनाग्रस्तांची संख्या ही 9000 हून अधिक झाली आहे. लॉकडाऊनमध्ये काही धक्कादायक घटना समोर येत आहेत. एका व्यक्तीने आपल्या मित्राला सुटकेसमध्ये भरून घरी आणल्याची अजब घटना समोर आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, मंगळुरूमध्ये ही घटना घडली. कोरोना व्हायरसचा वाढता संसर्ग लक्षात घेऊन अनेक अपार्टमेंटने बाहेरच्या व्यक्तींना आतमध्ये प्रवेश देण्यास नकार दिला आहे. मंगळुरूतील एका अपार्टमेंटमध्येही अशाच पद्धतीने बाहेरच्यांना आत घेतलं जात नाही. त्यामुळे त्या अपार्टमेंटमध्ये राहणाऱ्या एका मुलाने अजब शक्कल लढवली. त्याने आपल्या मित्राला चक्क सुटकेसमध्ये भरलं आणि घर आणल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. हा विचित्र प्रकार समोर आल्यावर सर्वच जण चक्रावून गेले आहेत तर पोलीसही हैराण झाले.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अपार्टमेंटमध्ये राहणाऱ्या एका मुलाने आपल्या मित्राला घरी आणण्यासाठी अपार्टमेंटकडे अनेकदा परवानगी मागितली. मात्र त्याला ही परवानगी मिळाली नाही. म्हणून त्याने मित्राला सुटकेसमधून घरी आणलं. मात्र अपार्टमेंटने आपल्याकडे अशी कोणतीही विनंती आली नसल्याचं म्हटलं आहे. शनिवारी मध्यरात्रीनंतर सुमारे 2 वाजता हा 17 वर्षाचा मुलगा एक मोठी सुटकेस आणि स्कूटी घेऊन बाहेर पडला. त्याने आपल्या मित्राला बोलावले आणि स्कूटीवर बसवून आपल्या सोबत अपार्टमेंटजवळ आणले.
अपार्टमेंटच्या बाहेर त्याने मित्राला सुटकेसमध्ये बसण्यास सांगितले आणि नंतर सुटकेस घेऊन तो आत आला. हे पाहिल्यावर इमारतीच्या सुरक्षा रक्षकाला काहीतरी विचित्र प्रकार सुरू असल्याची शंका आली. त्याने अपार्टमेंटला याबाबत माहिती दिली. त्यानंतर हा संपूर्ण प्रकार समोर आला. पोलिसांनी ही दोन्ही मुले अल्पवयीन असल्याने त्यांना समज देऊन सोडून दिले आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.
महत्त्वाच्या बातम्या
Coronavirus : ...अन् आईच्या अंत्यसंस्कारासाठी जवानाने केला तब्बल तीन दिवस 1100 किलोमीटरचा प्रवास
Coronavirus : Google ची बातच न्यारी; आजचं Doodle लय भारी, जाणून घ्या खासियत