नवी दिल्ली : देशात दिवसेंदिवस कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे. कोरोनावर मात करण्यासाठी सरकारकडून विविध उपाययोजना करण्यात येत आहेत. तसेच, देशात ३ मेपर्यंत लॉकडाऊन वाढविण्यात आले आहे.
या कोरोनाच्या लढ्यात अनेक डॉक्टर, नर्स आणि आरोग्य कर्मचाऱ्यांसोबत पोलीस व सरकारी अधिकारी, कर्मचारी खऱ्या अर्थाने आपले कर्तव्य बजावत आहेत. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी आणि लॉकडाऊनचे पालन करण्यासाठी प्रत्येक राज्यात पोलीस प्रशासन रात्रदिवस काम करत आहे.
यातच आम आदमी पार्टीचे नेते आणि राज्यसभेचे खासदार संजय सिंह यांनी ट्विटरवरून एक व्हिडीओ शेअर केला आहे. तसेच, त्यांनी लिहिले आहे की, "पोलिसाचे म्हणणे ऐकून तुमच्यावर फरक पडला नाही, तर वाचणे अवघड आहे...ऐका भावाचे भावनिक आवाहन."
खासदार संजय सिंह यांनी जो व्हिडीओ शेअर केला आहे. त्यामध्ये एक पोलीस कर्मचारी लॉकडाऊनदरम्यान पेट्रोलिंग करताना दिसत आहे. तसेच, तो पोलीस कर्मचारी म्हणत आहे की, "तुमच्या शरीराचा कोपरा अन् कोपरा तोडू, पण तुम्हाला कोरोना होऊ देणार नाही."
दरम्यान, सुरतमधील उधना पोलीस ठाण्याचे कॉन्स्टेबल प्रवीण पाटील यांना भीमनगर झोपडपट्टी परिसरात गर्दी झाल्याचे समजले. त्यानंतर ते पीसीआर व्हॅन घेऊन घटनास्थळी दाखल झाले. यावेळी लोकांनी दगडफेक करु नये, यासाठी पीसीआर व्हॅनमधील डाऊडस्पीकरच्या माध्यमातून लोकांना आपल्या घरी जाण्यासाठी आवाहन करताना म्हटले की, "तुमच्या शरीराचा कोपरा अन् कोपरा तोडू, पण तुम्हाला कोरोना होऊ देणार नाही."
लड्डाखचे भाजपा खासदार जामयांग सेरिंग नामग्याल यांनीही हा व्हिडीओ ट्विटरवर शेअर केला आहे. आतापर्यंत लाखो लोकांनी हा व्हिडीओ पाहिला आहे. हा व्हिडीओ इतका लोकप्रिय होईल, असे पोलीस कॉन्स्टेबल प्रवीण पाटील यांना वाटले नव्हते.