CoronaVirus केरळला विशेष सूट; रेस्टॉरंट, खासगी वाहतूक सुरु होणार
By ऑनलाइन लोकमत | Published: April 19, 2020 09:00 AM2020-04-19T09:00:44+5:302020-04-19T09:01:21+5:30
केंद्र सरकारच्या २० एप्रिलपासून लागू होणाऱ्या लॉकडाऊन सूटमध्ये ही परवानगी नाही.
थिरुवनंतपुरम : कोरोना व्हायरसचा प्रसार रोखण्यासाठी केंद्र सरकारने ३ मे पर्यंत लॉकडाऊन जाहीर केला आहे. मात्र, येत्या २० एप्रिलपासून काही व्यवसाय, उद्योगांनी सूट देण्याची तयारी सुरु झाली आहे. अशातच केरळ सरकारने १४ पैकी ७ जिल्ह्यांमधील व्यवहार सुरळीत करण्याचा निर्णय घेतला आहे. या जिल्ह्यांमध्ये रेस्टॉरंट उघडले जाणार असून ऑड-इव्हन फॉर्म्युल्यानुसार खासगी वाहनांची वाहतूक सुरु करण्याची परवानगी देण्यात येणार आहे.
केंद्र सरकारच्या २० एप्रिलपासून लागू होणाऱ्या लॉकडाऊन सूटमध्ये ही परवानगी नाही. मात्र, केरळ सरकारने केंद्रासमोर प्रस्ताव ठेवला होता. यामध्ये केरळच्या जिल्ह्यांना रेड, ऑरेंज ए, ऑरेंज बी आणि ग्रीन झोनमध्ये विभागण्यात आले होते. यापैकी तीन विभागांमध्ये लॉकडाऊनच्या काही नियमांमध्ये सूट देण्याची मागणी करण्यात आली होती. केंद्र सरकारने शुक्रवारी केरळच्या या प्रस्तावाला मंजुरी दिली आहे. यामुळे उद्या सोमवारपासून राज्यातील ७ जिल्ह्यांमध्ये ही विशेष सूट लागू करण्यावर काम सुरु झाले आहे.
यानुसार केरळमधील ग्रीन झोनमधील दोन जिल्ह्यांतील जनजीवन कोट्ट्यम आणि इडुक्की सोमवारपासून सुरळीत सुरु होणार आहे. कारण या जिल्ह्यामध्ये कोरोनाचा एकही रुग्ण उपचार घेत नाहीय. तर ऑरेंज बी झेनमध्ये थिरुवनंतपुरम, अलप्पुझा, त्रिशूर, पलक्कड आणि वायनाड या जिल्ह्यामधील काही प्रतिबंध हटविण्यात येणार आहेत.