बुलंदशहर: कोरोनाचं संक्रमण दिवसेंदिवस वाढत चालल्यानं देशात लॉकडाऊन करण्यात आला आहे. लॉकडाऊनमुळे देशातील उद्योगधंदे ठप्प आहेत. सर्वच कामकाज बंद असल्यानं कर्मचाऱ्यांना पगार द्यायचा कुठून, असा प्रश्न कंपन्यांना सतावतो आहेत. लॉकडाऊनच्या काळात अनेकांना नोकऱ्या गमवाव्या लागल्या आहेत. उत्तर प्रदेशही अनेक तरुण बेरोजगार झाले आहेत. त्यामुळे बेरोजगारीही दिवसेंदिवस वाढत चालली आहे. लॉकडाऊनमुळे लाखो रुपये खर्च करून बीबीए ते एमए अन् बीएडपर्यंत पदवी घेतलेल्या तरुणांनाही मनरेगामध्ये काम करावं लागतंय. बुलंदशहरच्या जुनेदपूर गावात मनरेगाचे काम सध्या जोरात सुरू आहे. हे काम अशिक्षित असलेल्या कामगारांसाठी आहे, परंतु लॉकडाऊननंतर सतेंद्र कुमार, सुरजित आणि रोशन कुमार हे पदवीधरही नोकरी नसल्यानं या ठिकाणीही मजुरी करत आहेत.सतेंद्र कुमारने सवा लाख खर्च करून बीबीए पदवी मिळविली, तर सुरजित सिंगने शिष्यवृत्तीद्वारे बीएड अभ्यासक्रम पूर्ण केला आणि रोशन कुमार यांनी एमए केले. तसेच वॉशिंग पावडर कंपनीत नोकरीही केली, पण लॉकडाऊनने आता या तिघांना मनरेगाचं काम करण्यास भाग पाडलं आहे. नोकरी गमावल्यानं २०० रुपयांच्या मजुरीवर ते माती उपसण्याचं काम करत आहेत. सतेंद्र कुमार म्हणाला की, माझ्याकडे बीबीए पदवी आहे, पण तरीही मला चांगली नोकरी मिळाली नाही. जिथे मिळाली तिथे फक्त सहा ते सात हजार पगार देत होते. लॉकडाउन सुरू झाल्यानंतर ती नोकरीही गमावली. जेव्हा तो इथे आला तेव्हा गावच्या प्रमुखानं मनरेगाच्या कामाला लावले.सुरजित कुमार म्हणाला की, माझ्याकडे एमए, बीएड पदवी आहे. मी नुकताच माझा अभ्यासक्रम पूर्ण केला आहे. नोकरी मिळण्यापूर्वीच लॉकडाऊन सुरू झालं आणि मग इथे मनरेगाच्या कामात मग्न झालो. रोशनकुमार म्हणाला की मी दोन घनफूट माती उपसण्याचं काम करतो. मला त्यासाठी दोनशे रुपये रोज मिळतो. मी एमए आहे, आधी काम करायचो, चांगले पैसे कमवायचो, लॉकडाऊन सुरू झालं आणि पोटापाण्यासाठी हे काम करावं लागलं. बुलंदशहरच्या जुनैदपूर गावात लॉकडाऊनपूर्वी 20 मजूर काम करायचे, आता ती संख्या 100 कामगारांवर गेली आहे. गाव प्रमुखांच्या मते, या मजुरांमध्ये 20हून अधिक लोक पदवीधारक आहेत. गाव प्रमुख वीरेंद्र सिंह म्हणाले की, ही मुले योग्य बोलत आहेत. लॉकडाऊननंतर त्यांची नोकरी गेली. जर त्यांची आर्थिक परिस्थिती हलाखीची असल्यानं त्यांना मजुरी करावी लागते आहे. सध्या देशभरात 14 कोटी लोकांची जॉब कार्ड बनविली गेली आहेत. या सर्वांना 100 दिवसांची कामे देण्यासाठी 2.8 लाख कोटींची गरज आहे. लॉकडाऊननंतर अनेक लोक बेरोजगार झाले असून, पोटाची खळगी भरण्यासाठी शिक्षित तरुणांनाही मजुरी करावी लागत असल्याचं भीषण वास्तव समोर आलं आहे.
हेही वाचा
पंतप्रधानांना हटवलं पाहिजे, असं मी कधी म्हणाले का?, ममतांचा भाजपावर पलटवार
...तर भारताला मर्यादित युद्ध लढावेच लागेल, राहुल गांधींनी शेअर केला 'पनाग'चा लेख
Cyclone Nisarga: रायगड जिल्ह्यासाठी 100 कोटी रुपये तातडीची मदत; मुख्यमंत्र्यांची घोषणा
घरकाम करणाऱ्या महिलेमुळे २० जण निघाले कोरोना पॉझिटिव्ह; 750 लोक झाले क्वारंटाइन
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या 'या' पावलांनंतर चीन बिथरला; भारताला दिला इशारा