नवी दिल्लीः कोरोनानं जगभरात थैमान घातलं असून, भारतालाही त्याचा फटका बसला आहे. देशात टाळेबंदी असल्यानं अनेक उद्योगधंदे ठप्प आहेत. अशा परिस्थितीत मोदी सरकार सामान्यांना दिलासा देण्याचा प्रयत्न करत आहे. विशेष म्हणजे या कोरोनाच्या संकटातही अनेक नेते राजकारण करत असल्याचं समोर आलं आहे. कोरोना विषाणूपासून ते अर्थव्यवस्थेच्या मुद्द्यांवरून मोदी सरकारवर टीका करणाऱ्या राहुल गांधींवरही आता भाजपानं पलटवार केला आहे. केंद्रीय मंत्री आणि भाजपाचे ज्येष्ठ नेते रविशंकर प्रसाद यांनी राहुल यांच्या आरोपांना एक एक करत उत्तर दिलं आहे. चीन आणि नेपाळच्या मुद्द्यावरून राहुल यांनी केंद्र सरकारला परिस्थिती स्पष्ट करण्यास सांगितले होते.त्यावर रविशंकर प्रसाद म्हणाले की, 'नरेंद्र मोदींच्या भारताकडे कोणीही डोळे वटारून दाखवू शकत नाहीत'. कॉंग्रेस नेत्यांनी कोरोनाविरुद्धच्या देशातील लढाईला खराब करून राजकीय फायद्यासाठी जनतेची दिशाभूल केल्याचा आरोपही त्यांनी केला आहे. प्रसाद म्हणाले की, पंजाब आणि राजस्थानसारख्या कॉंग्रेसशासित राज्यांनी सर्वप्रथम लॉकडाऊन लागू केले आहे. देशात या धोकादायक विषाणूमुळे आतापर्यंत केवळ 4345 लोक मृत्युमुखी पडले आहेत. दुसरीकडे, जगात 3 लाखांहून अधिक मृत्यू झाले आहेत. जगातील 15 देशांमध्ये कोरोना हा एक मोठा आजार बनला आहे. त्यांची लोकसंख्या 142 कोटी आहे. त्यामध्ये अमेरिका, इंग्लंड, फ्रान्स, जर्मनी, इटली, कॅनडा आणि इतर देशांचा समावेश आहे. 26 मेपर्यंत या देशांमध्ये कोरोनामधून सुमारे 3.43 लाख लोक मृत्युमुखी पडले आहेत. पुढे रविशंकर प्रसाद म्हणाले, भारताची लोकसंख्या 137 कोटी आहे आणि आपल्या देशात 4,345 लोकांचे मृत्यू झाले आहेत. 64 हजारांहून अधिक रुग्णांची कोरोनातून मुक्तता झाली आहे.राहुल गांधी देशाचा संकल्प अन् लढा कमकुवत करीत आहेत: प्रसादप्रसाद म्हणाले की, राहुल गांधी 5 मार्गांनी देशाच्या कोरोनाविरुद्धच्या लढ्याला आणि संकल्पाला कमकुवत करण्याचा प्रयत्न करत आहेत. 1- नकारात्मकता पसरवणे, 2- संकटाच्या वेळी देशाविरुद्ध काम करणे. 3- चुकीचं श्रेय घेणे, 4- सांगायचं वेगळंच आणि भलतंच काहीतरी करायचं. 5- चुकीच्या गोष्टी आणि खोट्या बातम्या पसरवणे. ' भिलवाडा मॉडेलचंही राहुल गांधींनी खोटारडेपणानं श्रेय घेतल्याचाही आरोप रविशंकर प्रसाद यांनी केला आहे. काँग्रेसचे मुख्यमंत्री राहुल गांधींचं म्हणणे ऐकत नाहीत? : भाजपालॉकडाऊनबाबत राहुल गांधींच्या प्रश्नांवर प्रसाद म्हणाले की, कॉंग्रेसशासित राज्यांनी सर्वप्रथम याची घोषणा केली. पंजाबने प्रथम लॉकडाऊन जाहीर केला. मग राजस्थान या राज्यानं लॉकडाऊनची घोषणा केली. त्यानंतर पंतप्रधान आणि मुख्यमंत्र्यांच्या बैठकीच्या अगोदर महाराष्ट्र आणि पंजाबने 31 मेपर्यंत लॉकडाऊनला मुदतवाढ दिली. प्रसाद म्हणाले, 'राहुल गांधी, तुम्ही म्हणता की लॉकडाऊन हा तोडगा नाही, तर मग तुम्ही आपल्या मुख्यमंत्र्यांना हे का स्पष्टपणे सांगत नाही? की ते तुमचे ऐकत नाहीत की तुमच्या मताचा काही विचार करीत नाहीत?, असा टोलाही प्रसाद यांनी लगावला आहे. 'राहुल जबाबदारीतून पळत काढत आहेत'महाराष्ट्राच्या युती सरकारमध्ये कॉंग्रेसला मोठे निर्णय घेण्याचा अधिकार नाही, या राहुल गांधींच्या कालच्या वक्तव्यावरही प्रसाद यांनी हल्लाबोल केला आहे. केंद्रीय मंत्री म्हणाले की, राहुल गांधी जबाबदा-यांपासून दूर पळण्याचा प्रयत्न करीत आहेत. लॉकडाऊनबद्दल राहुल गांधी यांनी खोटे बोलल्याचा आरोप प्रसाद यांनी केला. लॉकडाऊनचा देशाला फायदा झाला, असेही त्यांनी सांगितले. इतर मोठ्या देशांपेक्षा भारतात कमी मृत्यू झाले असतील आणि जास्त रुग्ण कोरोनातून मुक्त झाले असल्यास त्याचं श्रेय लॉकडाऊनला जाते, असंही रविशंकर प्रसाद म्हणाले आहेत.
हेही वाचा
भारत-चीन तणाव वाढला! युद्धाच्या तयारीला वेग द्या; शी जिनपिंग यांचे सेनेला आदेश
बिनकामी माणसंच सरकार पाडण्याचा विचार करू शकतात, पवार फडणवीसांवर भडकले
CoronaVirus News: आनंद महिंद्रांनी शेअर केला 'खास' फोटो; युजर्सनी दिल्या अशा प्रतिक्रिया
CoronaVirus News: राज्यात राष्ट्रपती राजवट लागू होणार का?; राणेंच्या 'त्या' विधानावर फडणवीस बोलले