आग्रा - कोरोना व्हायरस चा कहर जगभरात वाढत आहे. भारतात देखील दिवसेंदिवस कोरोनाबाधितांची संख्या वाढत आहे. या व्हायरसचा संसर्ग कमी करण्यासाठी संपूर्ण देशात पंतप्रधानांनी लॉकडाऊन घोषित केला आहे. मात्र, काही बेजबाबदार लोकं नियमांचं उल्लंघन करून घराबाहेर पडत आहेत. कोरोनाच्या वाढत्या संसर्गाच्या भीतीमुळे एका पतीने समाजहित लक्षात घेऊन पत्नीच्या अंत्यसंस्कारासाठी आलेल्या लोकांना घरी पाठल्याची बाब उघडकीस आली आहे.
आग्रा येथील न्यू विजय नगर कॉलनीतील नगला धानी भागात राहणारे देवकीनंदन त्यागी यांची पत्नी ममता यांचे बुधवारी सकाळी दीर्घ आजाराने निधन झाले. रात्री दहा वाजता त्यांचा मृतदेह रुग्णालयातून घरी आणला. त्यावेळी त्यांचे हितचिंतक आणि जवळचे नातेवाईक जमले होते. त्यावेळी भावनाविवश झालेले पोलीस देखील काही करू शकले नाही. अखेर पतीने मोठा निर्णय घेत सर्वांना घरी परत जाण्यास सांगितले. देश हितासाठी त्याने घेतलेल्या निर्याणाचा जे बेजाबदार विनाकारण घराबाहेर पडतात त्यांनी आदर्श घेतला पाहिजे. पत्नी ममता यांच्या मृत्यूनंतर अंत्यसंस्काराला लोकांनी गर्दी केली. मात्र, देवकीनंदन त्यागी यांनी लोकांसमोर हात जोडून लॉकडाऊन असल्यामुळे तुम्ही गर्दी करू नका आणि सगळ्यांनी घरी जा असं सांगितलं आणि केवळ १० नातेवाईकांच्या उपस्थितीत अंत्यसंस्कार केले.
लॉकडाऊन आणि गर्दी न जमविण्याच्या शासकीय आदेशामुळे गोंधळ उडाला होता. मोठ्या संख्येने जमा झालेल्यांच्या भावनांमध्ये पोलिसांनाही काही निर्णय घेता आला नाही. दुसरीकडे, कुटुंबातील लोक रडत होते. काय करावं आणि काय करू नये याबद्दल चर्चा सुरू झाल्या. सर्वांनी अंत्ययात्रेमध्ये सामील होण्याचा निर्धार केला. देवकीनंदन यांच्या घराबाहेर गर्दी झाली होती.
दुबईतील मुलाने व्हिडीओ कॉलद्वारे घेतले अंतिम दर्शन
देवकीनंदन यांचा मोठा मुलगा दीपक मर्चंट नेव्हीमध्ये तैनात आहे. सध्या दुबईमध्ये नियुक्ती आहे. लॉकडाऊनमुळे येऊ शकला नाही. तो निर्बंधांमुळे तेथून बाहेर पडू शकला नाही. व्हिडिओ कॉलद्वारे त्याला त्याच्या आईचे अंतिम दर्शन देण्यात आले. हे विदारक आणि भावनिक दृश्य पाहून घटनास्थळावर उपस्थित प्रत्येकाच्या डोळ्यांत अश्रू तरळले.