नवी दिल्ली : देशात १३२ दिवसांनंतर प्रथमच नव्या रुग्णांची संख्या ३० हजारांच्या खाली आली आहे, तर १२४ दिवसांनंतर उपचाराधीन रुग्ण चार लाखांच्या आत आहेत. उपचाराधीन रुग्णांची संख्या सध्या ३,९८,१०० असून, एकूण रुग्णांच्या संख्येत हे प्रमाण १.२७ टक्के, तर रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९७.३९ टक्के आहे.
देशात मंगळवारी सकाळी ८ वाजता संपलेल्या २४ तासांत कोरोनाचे २९,६८९ नवे रुग्ण आढळले, तर ४१५ जणांचा मृत्यू झाला. देशात आता एकूण मृतांची संख्या ४,२१,३८२ झाली आहे.२४ तासांत नव्या रुग्णांची संख्या १३,०८९ ने कमी झाली, तर एकूण बाधितांच्या संख्येत मृत्यूदर हा १.३४ टक्के आहे. देशव्यापी मोहिमेत आतापर्यंत ४४.१९ कोटी लोकांना कोरोना विषाणू प्रतिबंधक लस दिली गेली आहे, असेही निवेदनात म्हटले आहे. देशात आतापर्यंत कोरोनाचे ३,१४,४०,९५१ रुग्ण आहेत. सोमवारी १७,२०,११० कोविड चाचण्या घेतल्या गेल्या व या बरोबर आतापर्यंत ४५,९१,६४,१२१ चाचण्या केल्या गेल्या. रुग्ण सकारात्मक निघण्याचा दैनिक दर १.७३ टक्के तर साप्ताहिक दर २.३३ टक्के आहे.
मुलांसाठीची लस ऑगस्टमध्ये अपेक्षितमुलांसाठी कोविड-१९ लस येत्या ऑगस्ट महिन्यात देशात उपलब्ध होण्याची अपेक्षा असल्याचे केंद्रीय आरोग्यमंत्री मनसुख मांडविया यांनी मंगळवारी भाजप संसदीय पक्षाच्या बैठकीत म्हटले. बैठकीस पंतप्रधान नरेंद्र मोदी उपस्थित होते.
सध्या २ ते ६ वयोगटातील मुलांवर येथील एम्समध्ये कोव्हॅक्सिनच्या चाचण्या सुरू आहेत. सप्टेंबर महिन्यात मुलांसाठी कोविडवरील लस उपलब्ध होईल, असे डॉ. गुलेरिया २२ जून रोजी म्हणाले होते.
गेल्या आठवड्यात अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थेचे (एम्स) संचालक डॉ. रणदीप गुलेरिया यांनी म्हटले होते की, भारत बायोटेकच्या कोव्हॅक्सिन लसीच्या मुलांवरील चाचण्या सुरू असून त्यांचे निष्कर्ष सप्टेंबरमध्ये अपेक्षित आहेत.