नवी दिल्ली : देशभरात ३६,३७० नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. जुलैच्या मध्यापासून आतापर्यंतची ही सर्वांत कमी संख्या आहे. रुग्णांची एकूण संख्या ७९.४६ लाखांवर पोहोचली आहे. गेल्या २४ तासांत ४८८ मृत्यू झाले असून मृतांची एकूण संख्या १,१९,५०२ झाली आहे. देशात १८ जुलै रोजी ३६ हजारांपेक्षा कमी रुग्णांची नोंद झाली होती. सप्टेंबरमध्ये दैनंदिन सरासरी ९० हजारांवर असलेली रुग्णसंख्या आता सरासरी ५५ हजारांवर आली. ऑक्टोबरच्या सुरुवातीला ही सरासरी ८० हजारांवरून ४५ हजारांवर आली आहे. मृत्यूचे प्रमाण सप्टेंबरपासून १.५ टक्क्यावर कायम आहे. हे प्रमाण एक टक्क्याच्याही खाली आणण्याचे प्रयत्न आहेत. रुग्णांच्या संख्येत घट होत असली तरी सणासुदीच्या काळात अधिक दक्षता बाळगणे गरजेची आहे.
केरळात सर्वात कमी मृत्यूदर देशातील १४ राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांत एक टक्क्यापेक्षा कमी मृत्यूदर आहे. केरळमध्ये मृत्यूदर सर्वांत कमी म्हणजे ०.३४ टक्के इतका आहे. दिवसभरात केरळमध्ये ४२८७, कर्नाटकात ४१३०, प. बंगालमध्ये ४१२१, महाराष्ट्रात ३६४५ आणि दिल्लीत २८३२ नव्या रुग्णांची नोंद झाली आहे.
महाराष्ट्रात मृत्यू जास्तमहाराष्ट्रात दिवसभरात कोरोनामुळे ८५ जणांचे मृत्यू झाले. प. बंगालमध्ये ५९, दिल्लीत ५४, छत्तीसगढमध्ये ४३ आणि कर्नाटकात ४२ मृत्यूंची दिवसभरात नोंद झाली.
रिकव्हरी रेट ९० टक्क्यांवर सध्या ६,२५,८५७ सक्रिय रुग्ण असून बरे होणाऱ्यांचे प्रमाण ९० टक्क्यांवर पोहोचला आहे. आतापर्यंत ७२ लाखांहून अधिक रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. नव्याने लागण होणाऱ्यांच्या तुलनेत बरे होणाऱ्या रुग्णांची संख्या जवळपास दुपटीपेक्षा अधिक आहे.
कोरोनाचे ७८ टक्के रुग्ण १० राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशात
जगातील अनेक देशांत कोरोना पुन्हा डोके वर काढत आहे. ज्या देशांनी स्वत:ला कोरोनामुक्त घोषित केले होते तिथे कोरोनाने पुन्हा दस्तक दिली आहे. भारतात कोरोनाने होणाऱ्या मृत्यूदरात घसरण होत आहे आणि बरे होणाऱ्या रुग्णांचे प्रमाण वाढत आहे. कॅडिलाच्याही दुसऱ्या टप्प्यातील चाचण्या पुढे जात आहेत. सीरम लसीच्या दुसऱ्या टप्प्यातील चाचण्या पूर्ण होत आहेत. याशिवाय ब्राझील, द. आफ्रिका आणि अमेरिकेत या लसीवरील चाचण्या सुरू आहेत.
देशाचा रिकव्हरी रेट आता ९०.६२ झाला आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाचे सचिव राजेश भूषण यांनी मंगळवारी पत्रकार परिषदेत सांगितले की, कोरोनाचे ७८ टक्के रुग्ण १० राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशात आहेत. गत २४ तासांत पाचे राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशात महाराष्ट्र, प. बंगाल, दिल्ली, छत्तीसगड आणि कर्नाटक या राज्यांत कोरोनामुळे ५८ टक्के मृत्यू झाले आहेत. राजेश भूषण यांनी सांगितले की, सुरुवातीला १ ते १० लाख कोरोना रुग्ण बरे होण्यासाठी ५७ दिवस लागले, तर आता १० लाख रुग्ण बरे होण्यासाठी केवळ १३ दिवस लागले. आयसीएमआरचे महासंचालक बलराम भार्गव यांनी सांगितले की, कोवॅक्सिनच्या तिसऱ्या टप्प्याला मंजुरी मिळाली आहे.