- विकास झाडेनवी दिल्ली : उत्तर प्रदेश, गुजरात आणि बिहार या राज्यांनी कोविड -१९ चा प्रसार रोखण्यासाठी सर्वोत्तम कामगिरी केली आहे. तर. केरळ, तेलंगणा आणि आंध्र प्रदेश या राज्यांनी कोरोनाची लागण झालेले सर्वाधिक जीव वाचवले. महाराष्ट्रात मात्र कोरोना प्रसार रोखण्यासाठी आणि लोकांचा जीव वाचवण्यासाठी सर्वात निकृष्ट कामगिरी झाली. आर्थिक सर्वेक्षण अहवालातील हा निष्कर्ष महाआघाडी सरकारच्या कामगिरीवर बोट ठेवणारा ठरला आहे.महाराष्ट्रात डिसेंबरच्या पहिल्या पंधरवड्यापर्यंत ४८,५०० रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला, तर मार्च २०२० पासून महाराष्ट्रातील एकूण १८ लाखांपेक्षा अधिक लोकांना कोविड-१९ ची बाधा झाली. अर्थसंकल्पाच्या पूर्वी देशाची आर्थिक परिस्थिती दर्शविणारा आर्थिक सर्वेक्षण अहवाल केंद्र सरकारने जाहीर केलाआहे.या अहवालात कोरोना महामारीला अर्थव्यवस्थेच्या नुकसानीसाठी जबाबदार धरले आहे. यामध्ये कोरोनाविरुद्ध लढण्याच्या विविध राज्यांच्या प्रयत्नांचीही नोंद घेतली आहे. कोरोना रोखणे आणि मृत्यूची संख्या थांबविण्यात महाराष्ट्र सर्वात खालच्या स्थानावर असल्याचे नोंदविण्यात आले. लसीकरण सुरू आहे. त्यामुळे येत्या काळात मोठ्या प्रमाणात रोजगाराच्या संधी निर्माण होतील. कोरोना कालावधीत तेलाचे उत्पादन ६ टक्के आणि नैसर्गिक वायूच्या उत्पादनात ५ टक्के घट झाली असल्याचे म्हटले आहे. आर्थिक वर्ष २०१९ मध्ये तेलाचे उत्पादन ३४.२० दशलक्ष मेट्रिक टन होते. तर आर्थिक वर्ष २०२० मध्ये ते १२.१७ दशलक्ष मेट्रिक टन इतके मर्यादित झाले. त्याचप्रमाणे सन २०१९ मध्ये नैसर्गिक वायू उत्पादन ३२.८७ अब्ज घनमीटर होते. आर्थिक वर्ष २०२० मध्ये ते ३१.१८ अब्ज घनमीटर इतकेच होते.
देशात कोरोना बळींची संख्याही घटू लागली नवी दिल्ली : देशातील कोरोनाच्या उपचाराधीन रुग्णांची संख्या आणखी घटली असून, हे प्रमाण अवघे १.४० टक्के झाले आहे. या संसर्गातून १ कोटी ४ लाख ९६ हजार लोक बरे झाले असून, त्यांचे प्रमाण ९७.१६ टक्के आहे. कोरोना रुग्णांच्या मृत्यूदरात आणखी घट होऊन तो १.४३ टक्के झाला.देशातील कोरोना रुग्णांची एकूण संख्या १,०८,०२,५९१ असून त्यापैकी १,०४,९६,३०८ जण बरे झाले आहेत. शुक्रवारी कोरोनाचे १२,४०८ नवे रुग्ण आढळले व १५,८५३ जण बरे झाले. शुक्रवारी आणखी १२० जण मरण पावले असून, बळींची संख्या १,५४,८२३ झाली आहे. देशात ४९,५९,४४५ जणांना आतापर्यंत कोरोनाची लस देण्यात आली आहे. कोरोनाच्या उपचाराधीन रुग्णांची संख्या १,५१,४६० आहे. नव्या विषाणूचा स्पेनमध्ये द. आफ्रिकेतून शिरकावदक्षिण आफ्रिकेत सापडलेल्या नव्या कोरोना विषाणूमुळे स्पेनमध्ये आतापर्यंत दोन जण बाधित झाले आहेत. या देशाने ब्राझील, दक्षिण आफ्रिका येथून येणाऱ्या प्रवाशांवर तात्पुरती प्रवेशबंदी घातली आहे.