बंगळुरु – चीनमधून पसरलेल्या कोरोना व्हायरसमुळे अनेक देशांत लॉकडाऊन लागू करण्यात आला. जगभरातील ८० लाखांहून अधिक लोकांना कोरोनाची लागण झाली तर ३ लाखांहून अधिक लोकांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. भारतातही कोरोनाबाधितांचा आकडा दिवसेंदिवस वाढत आहे. देशात कोरोनाग्रस्तांचा आकडा ३ लाखांच्या वर पोहचला आहे.
कर्नाटकात वाढणाऱ्या कोरोनाग्रस्तांच्या संख्येवर भाजपा सरकारनं चिंता व्यक्त केली आहे. याबाबत मुख्यमंत्री बीएस येडियुरप्पा यांनी माध्यमांशी संवाद साधताना सांगितले की, राज्यातील जनतेनं सोशल डिस्टेंसिंगच पालन करावं, अन्यथा पुन्हा एकदा लॉकडाऊन लागू करावा लागेल. त्यात सर्वकाही बंद करण्यात येईल. बंगळुरुमध्ये कोरोनाचे रुग्ण वाढत आहेत. त्यामुळे खबरदारी म्हणून शहरातील काही भाग सील करण्यात आले असल्याचं त्यांनी सांगितले.
तसेच आज मंत्री आणि अधिकाऱ्यांची बैठक बोलावण्यात आली होती. या बैठकीत कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर पुढील उपाययोजना आणि परिस्थितीचा आढावा घेण्यात आला. कोरोना ग्रस्तांच्या उपचारासाठी बंगळुरुमध्ये सर्व सुविधा उपलब्ध करण्यात आल्या आहेत. व्यवस्था करुन ठेवली आहे पण बंगळुरुमध्ये वाढणारे रुग्ण चिंताजनक आहेत. त्यामुळे लोकांना आवाहन आहे की, सोशल डिस्टेंसिंगचं तंतोतंत पालन करा, अन्यथा पुन्हा लॉकडाऊन लागू करावा लागू शकतो असं मुख्यमंत्री बीएस येडियुरप्पा यांनी म्हटलं आहे.
दरम्यान, घातक कोरोना विषाणूने आता कर्नाटकाच्या राजकीय आस्थापनात देखील प्रवेश केला आहे. कर्नाटकचे वैद्यकीय शिक्षण मंत्री के. सुधाकर यांचे वडील कोरोना पॉझिटिव्ह आढळल्यानंतर अवघ्या एक दिवसाच्या आत मंत्र्यांची पत्नी आणि कन्येला कोरोनाचा संसर्ग झाल्याचे स्पष्ट झाले आहे. सुदैवाने सुधाकर आणि त्यांच्या दोन मुलांचे तपासणी अहवाल निगेटिव्ह आले आहेत.
त्याचसोबत येत्या स्वातंत्र्य दिनापर्यंत कर्नाटकातील कोरोना बाधितांची संख्या २५ हजारपर्यंत पोहोचेल असा अंदाज राज्याच्या कोव्हीड वॉर रूमचे इन्चार्ज मुनिष मोदगील यांनी व्यक्त केला आहे. राज्यातील कोरोना संसर्गाचा सध्याचा ३ टक्के दर पाहता प्रक्षेपित दर ४ टक्के इतका पकडून मोदगील यांनी हा अंदाज वर्तविला आहे. विषाणू किती वेगाने पसरतोय यावर प्रक्षेपित दर ठरत असल्यामुळे बाजी त्यांचा निश्चित आकडा सांगता येणे शक्य नाही. तथापि या संदर्भात पुढील ५० ते ६० दिवस निर्णय ठरणार असल्यामुळे सर्वसामान्य जनतेने मास्कचा वापर, सोशल डिस्टंसिंगचे पालन, सतत हात धुणे या गोष्टींच्या बाबतीत अधिक जागरूक राहणे गरजेचे आहे, असे मनीष मोदगील यांनी स्पष्ट केले आहे.