कोलकाता : जगभरात कोरोना व्हायरसने हाहाकार माजला आहे. भारतात सुद्धा कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. कोरोनावर मात करण्यासाठी देशात ३ मेपर्यंत लॉकडाऊन सुरु आहे. या लॉकडाऊनमुळे अनेक राज्यात अडकलेल्या बंगालींना घरी परतण्याचे आश्वासन पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी दिले आहे. सोमवारी ममता बॅनर्जी यांनी भावूक ट्विट करत म्हटले आहे की, परराज्यात अकडलेल्या बंगाली नागरिकांच्या परतीसाठी सर्वतोपरी मदत केली जाईल. त्यामुळे पश्चिम बंगालच्या बाहेर अडकलेल्या लाखो नागरिकांना घरी परतण्याची आशा आहे.
पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी ट्विट करत म्हणाल्या की, "कोरोना संकटाच्या काळात आम्ही राज्यातील जनतेसोबत आहेत. लॉकडाऊनमध्ये राज्याबाहेर देशातील वेगवेगळ्या भागात अडकलेल्या नागरिकांची मदत करण्यासाठी बंगाल सरकार शक्य ती मदत करण्यास तयार आहे. यासंदर्भात अधिकाऱ्यांना आवश्यक त्या सूचनाही देण्यात आल्या आहेत."
याचबरोबर, ममता बॅनर्जी यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे की, "मी इथे आहे, तोपर्यंत बंगालमधील कोणत्याही व्यक्तीला असहाय्य वाटू नये. संकटाच्या या काळात मी तुमच्याबरोबर आहे. मी वैयक्तिकरित्या या प्रकरणाकडे लक्ष देत आहे आणि सर्वांना शक्य ती मदत करण्यास आम्ही कसलीही कसर सोडणार नाही. यासाठी प्रयत्न सुद्धा सुरु केले आहेत." तसेच, राजस्थानच्या कोटामध्ये अडकलेल्या बंगालमधील सर्व विद्यार्थ्यांना लवकरच परत आणले जाईल, असे आश्वासनही ममता बॅनर्जी यांनी दिले आहे.
दरम्यान, लॉकडाऊनमुळे बाहेर राज्यात अडकलेल्या लोकांना आपल्या राज्यात परत आणण्यासाठी उत्तर प्रदेश सरकारने पुढाकार घेतला आहे. कोट्यात अडकलेल्या विद्यार्थ्यांना परत आणण्यासाठी उत्तर प्रदेश सरकारने राजस्थानला बसेस पाठविल्या. सर्व विद्यार्थी सुखरूप राज्यात परत आणले. त्याचबरोबर, महाराष्ट्रातील नांदेडमध्ये अडकलेल्या ३८०० शीख यात्रेकरूंना परत आणण्यासाठी पंजाब सरकार सुद्धा प्रयत्न करत आहे. १०० शीखांची पहिली तुकडीही महाराष्ट्रातून रवाना झाली आहे. याशिवाय, ओडिशाचे मुख्यमंत्री नवीन पटनायक यांनी महाराष्ट्रात अडकलेल्या आपल्या राज्यातील लोकांना परत पाठविण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चा केली आहे.