तिरुअनंतपुरम - देशात कोरोना व्हायरसने थैमान घातले आहे. गेल्या २४ तासांत १३३४ कोरोनाचे नवे रुग्ण आढळले आहेत, तर २७ जणांचा मृत्यू झाला आहे. आतापर्यंत देशात १५७१२ लोकांना कोरोनाची बाधा झाल्याचे समोर आहे. तर ५०७ लोकांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे देशात चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.
यातच आता केरळमध्ये दुबईहून आलेल्या एका व्यक्तीला २९ दिवस आयसोलेशन वार्डमध्ये ठेवण्यात आल्यानंतर कोरोनाची बाधा झाल्याचे समोर आले. या घटनेमुळे डॉक्टरांनाही धक्का बसला आहे. हा व्यक्ती आणि त्याचा भाऊ दुबईहून आले होते. त्यानंतर त्यांना क्लारंटाइन करण्यात आले होते.
दरम्यान, त्यांच्या वडिलांना वयाशी संबंधित आजारांमुळे खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र, नंतर ते कोरोना पॉझिटिव्ह आढळले. यानंतर त्यांच्या संपूर्ण कुटुंबाला कोझिकोड मेडिकल कॉलेजमध्ये ठेवण्यात आले. त्यावेळी कुटुंबातील तिघांना कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले होते. मात्र, या कुटुंबातील एका व्यक्ती २९ दिवस आयसोलेशन वार्डमध्ये ठेवल्यानंतरही कोरोना पॉझिटिव्ह सापडला आहे.
कोरोना व्हायरसच्या प्रसाराबद्दल आता अधिक अभ्यास करण्याची गरज आहे. आता पहिल्या चाचणीत कोरोना निगेटिव्ह सापडलेल्यांची पुन्हा चाचणी करण्यात येईल. या व्यतिरिक्त चाचणीत कोणत्याही प्रकारची शंका आढळल्यास उच्च केंद्रात नमुना तपासला जाऊ शकतो, असे जिल्हा वैद्यकीय अधिकाऱ्यांनी सांगितले.
कोरोना चाचणीबाबत देशाच्या विविध भागात वेगवेगळे अहवाल येत आहेत. अलीकडेच, अहमदाबादमधील एक युवती न्यूयॉर्कहून आली होती. तिला ३२ दिवस आयसोलेशन वॉर्डमध्ये ठेवण्यात आले होते. डॉक्टरांनी सांगितले होते की, या युवतीला इतके दिवस रुग्णालयात ठेवण्याचे कारण तिचे तब्येत आहे. तिला आयसोलेशन वॉर्डमध्ये ठेवल्यानंतर तिची 9 वेळा वैद्यकीय चाचणी घेण्यात आली, त्यामध्ये ती 6 वेळा कोरोना पॉझिटिव्ह आणि दोनदा कोरोना निगेटिव्ह आढळली.