नवी दिल्ली - देशात कोरोनाचा कहर पाहायला मिळत आहे. कोरोना रुग्णांच्या संख्येत सातत्याने वाढ होत असल्याने चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. मात्र याच दरम्यान दिलासादायक माहिती मिळत आहे. कोरोनाच्या संकटात सुखावणारी आकडेवारी समोर आली आहे. देशातील कोरोना रुग्णांच्या संख्येने तब्बल 79 लाखांचा टप्पा पार केला आहे. तर एक लाखांहून अधिक लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. तर दुसरीकडे कोरोनावर मात केलल्या रुग्णांच्या संख्येतही मोठी वाढ झाल्याचं पाहायला मिळत आहे.
देशभरात 70 लाखांहून अधिक लोकांनी व्हायरसवर मात करून कोरोना विरोधातील लढाई जिंकली आहे. उपचारानंतर कोरोनातून ठीक झालेल्या रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. नवीन रुग्णांपेक्षा रुग्णांचे बरे होण्याचे प्रमाण जास्त आहे. कोरोनातून बरे होण्याचे प्रमाण हे आता जवळपास 90 टक्के झाले आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने याबाबत माहिती दिली आहे. देशातील अनेक राज्यांमध्ये रुग्णांचे बरे होण्याचे प्रमाण हे सातत्याने वाढत आहे. कोरोनाच्या या आकडेवारीने संकटात मोठा दिलासा दिला आहे.
देशात कोरोना चाचणी देखील मोठ्या प्रमाणात केली जात आहे. मास्क, क्वारंटाईन, सोशल डिस्टंसिंग, होम आयसोलेशनच्या माध्यमातून खबरदारीच्या सर्व उपाययोजना या केल्या जात आहे. विविध रुग्णालयात आणि क्वारंटाईन सेंटरमध्ये कोरोनाग्रस्तांवर योग्य उपचार सुरू आहेत. देशातील कोरोना प्रादुर्भावाचा वेग कमी होताना दिसत आहे. मात्र अजूनही परिस्थिती पूर्णपणे नियंत्रणात आलेली नाही. गेल्या काही दिवसांपासून सातत्यानं कोरोना रुग्णांच्या संख्येत घट होत आहे.
कोरोनावरील स्वदेशी लस नेमकी कधी उपलब्ध होणार?, भारत बायोटेकने दिली महत्त्वाची माहिती
जगभरात कोरोना व्हायरसने थैमान घातले असून कोरोनावर लस शोधण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न सुरू आहेत. भारतीय कंपनी भारत बायोटेक (Bharat Biotech) स्वदेशी कोरोना व्हायरस वॅक्सीन (Covid 19 Vaccine) 'कोवॅक्सिन' (Covaxin) वर काम करत आहे. ड्रग्स कंट्रोलर जनरल ऑफ इंडिया (DCGI) ने कंपनीच्या या लसीच्या तिसऱ्या टप्प्यातील चाचणीला मंजुरी दिली आहे. याच दरम्यान भारत बायोटेक कंपनीने मोठा दावा केला आहे. कोरोना व्हायरसवरील ही ही स्वदेशी लस जून 2021 पर्यंत उपलब्ध होईल असा दावा कंपनीने केला आहे. हैदराबादमध्ये असलेल्या या कंपनीने 2 ऑक्टोबर रोजी DCGI कडे तिसऱ्या टप्प्यातील चाचणीसाठी अर्ज केला होता. कंपनीला यासाठी परवानगी देण्यात आली आहे. 12 ते 14 राज्यातील 20 हजारहून अधिक नागरिकांवर या लसीची चाचणी होणार आहे. मार्च अखेरपर्यंत या लसीचे सर्व परिणामांची माहिती मिळू शकते.
भय इथले संपत नाही! कोरोनामुळे रुग्णाचं फुफ्फुस झालं "लेदर बॉल"सारखं, धडकी भरवणारी केस
कोरोनाबाबत संशोधन सुरू असून संशोधनातून नवनवीन माहिती समोर येत आहे. पुन्हा एकदा धडकी भरवणारी माहिती आता समोर आली आहे. कोरोना व्हायरसचा शरिरावर अत्यंत वाईट परिणाम होत आहे. अशीच एक चिंता वाढवणारी केस आता समोर आली आहे. कोरोनामुळे मृत्यू झालेल्या एका रुग्णाचं फुफ्फुस लेदर बॉलसारखं टणक झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. शवविच्छेदनातून ही माहिती समोर आली असून चिंता वाढली आहे. कर्नाटकमधील एका रुग्णाचे शवविच्छेदन केल्यानंतर हे आढळून आलं आहे. कोरोना व्हायरस माणसाच्या शरिरातील विविध अवयवांवर हल्ला करतं. प्रामुख्याने फुफ्फुसावर हल्ला केला जातो. कोरोनामुळे रुग्णाच्या फुफ्फुसाची किती भयंकर अवस्था होते हे कर्नाटकमधील रुग्णाच्या शवविच्छेदनानंतर दिसून आलं आहे.