नवी दिल्ली - देशातील कोरोनाग्रस्तांची संख्या 81,37,119 वर पोहोचली आहे. गेल्या 24 तासांत कोरोनाचे 48,268 नवे रुग्ण आढळून आले असून 551 जणांचा मृत्यू झाला आहे. कोरोनामुळे आतापर्यंत देशभरात तब्बल 1,21,641 लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. देशातील विविध रुग्णालयात, क्वारंटाईन सेंटरमध्ये कोरोनाग्रस्तांवर उपचार सुरू आहेत. याच दरम्यान एक महत्त्वाची माहिती समोर आली आहे. रुग्णालयात न जाता फक्त एका गोष्टीमुळे घरच्या घरी जवळपास 100 रुग्ण हे बरे झाले आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, कोरोनाची सौम्य लक्षणं असलेल्या रुग्णाना होम आयसोलेशनचा सल्ला देण्यात आला आहे. अशाच 100 कोरोना रुग्णांवर मध्य प्रदेशच्या गुना जिल्ह्यातील 9 डॉक्टरांनी व्हिडीओ कॉलच्या माध्यमातून उपचार केले आहेत. व्हिडीओ कॉलच्या मदतीने उपचार केल्यामुळे रुग्ण कोरोनातून ठणठणीत बरे झाले आहेत. दोन महिन्यांच्या कालावधीत डॉक्टरांनी निरीक्षण व टिप्स देत कोरोना रुग्णांना बरं केलं आहे. पहिल्यांदाच जिल्ह्यात घरात राहून 107 पैकी 100 कोरोना रुग्णांची प्रकृती सुधारली आहे.
व्हिडीओ कॉलवर केले उपचार
डॉक्टरांनी भोपाळमध्ये होम क्वारंटाईन असलेल्या रुग्णांवर उपचार केले आहेत. जिल्ह्यात आतापर्यंत 925 रुग्णांना कोरोनाची लागण झाल्याची माहिती समोर आली होती. यापैकी 15 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. मात्र सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे गेल्या 2 महिन्यात 107 कोरोना संसर्ग झालेल्या व होम क्वारंटाईनमध्ये असलेल्या रुग्णांवर डॉक्टरांच्या निरीक्षणाखाली उपचार सुरू होते. त्यांना दिवसातून दोन वेळा औषधांचा डोस दिला जात होता व व्हिडीओ कॉलवर त्यांच्यावर उपचार केला जात होते. त्यामुळे 100 रुग्णांची तब्येत बरी झाली असून ते कामात रुजू झाले आहेत. डॉक्टरांचं आणि त्यांच्या कामाचं कौतुक केलं जात आहे.
रुग्णांनी डॉक्टरांचे मानले आभार
आरोग्य विभागाने कोविड कमांड अँड कंट्रोल सेंटरमधील डॉ.नीरज भदौरिया, डॉ. प्रमिला श्रीवास्तव, डॉ. कपिल रघुवंशी, डॉ. मोहन सिंह राजपूत, डॉ. कुलदीप बनावे, डॉ. अंकेश अग्रवाल, डॉ. आकंक्षा गुप्ता, डॉ. अरुणा रघुवंशी आणि डॉ. निकिता सोनी होम आयसोलेशनमध्ये भर्ती असलेल्या रुग्णांवर व्हिडीओ कॉलच्या माध्यमातून उपचार करत होते. तर स्टाफ नर्स भारती राठोड, रीना धाकड, किर्ती खत्री, संतोष वर्मा आणि द्रोपदी यांनीही उपचारासह अन्य आजाराची माहिती घरबसल्या दिली. अनेक रुग्णांनी या डॉक्टरांचे आभार मानले आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.
मोठा दिलासा! कोरोना हरणार, देश जिंकणार; ५० टक्क्यांनी कमी होतेय रुग्णवाढ, सुखावणारा ग्राफ
कोरोनाचा वेग मंदवताना दिसत आहे. दिलासादायक माहिती मिळत असून कोरोनाचा सुखावणारा ग्राफ समोर आला आहे. देशातील कोरोना रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९१.१५ टक्क्यांवर पोहोचले आहे, तर उपचार घेत असलेल्या रुग्णांची संख्या ६ लाखांहून कमी झाली आहे. गेल्या काही महिन्यांपासून भीतीचे वातावरण निर्माण केलेल्या कोरोनाबाबत आता महत्त्वाची महिती समोर आली आहे. सप्टेंबरच्या मध्यावर शिखर गाठल्यानंतर कोरोनाचा ग्राफ आता ५० टक्क्यांनी खाली घसरला आहे. रुग्ण आणि मृत्यूच्या वाढीच्या तुलनेत घट झाल्याचं स्पष्ट होत आहे.