नवी दिल्ली - देशातील रुग्णांची संख्या 10 लाखांवर गेली असून, आता कोरोनाच्या सामूहिक संसर्गालाही सुरुवात झाली आहे. कोरोनाग्रस्तांचा आकडा वाढला असून रुग्णांची एकूण संख्या 10,77,618 वर पोहोचली आहे. तर कोरोनामुळे देशात 26,816 लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. आरोग्य मंत्रालयाने याबाबत माहिती दिली आहे. कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी विविध उपाय केले जात आहेत. वेगाने पसरणाऱ्या कोरोनामुळे लोकांच्या मनात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. याच दरम्यान अनेक धक्कादायक घटना समोर येत आहेत.
बिहारमध्येही कोरोनाचा कहर पाहायला मिळत आहे. रुग्णांची संख्या सातत्याने वाढत आहेत. याच दरम्यान बिहारच्या सिवान जिल्ह्यात माणुसकीला काळीमा फासणारी एक भयंकर घटना समोर आली आहे. रुग्णालयाबाहेर एक महिला भर पावसात कित्येक तास जमिनीवर पडून होती. मात्र कोणीही तिच्या मदतीसाठी पुढे आले नाही. एका ट्विटर युजरने आपल्या ट्विटर अकाऊंटवरून या धक्कादायक घटनेचे काही फोटो पोस्ट केले आहेत. त्यानंतर ही घटना समोर आली आहे.
रुग्णालयाबाहेर जमिनीवर पडून असलेल्या या महिलेचा एक व्हिडीओही सोशल मीडियावर जोरदार व्हायरल झाला आहे. ही घटना वेगाने पसरल्यानंतर रुग्णालय प्रशासनाने महिलेला रुग्णालयात दाखल करून घेतले. तसेच तिच्यावर उपचार सुरू केले आहेत. तिची कोरोना चाचणी करण्यात येणार असल्याची देखील माहिती दिली आहे. "माझ्या शेजारी राहणाऱ्या फळ विक्रेत्याच्या मुलाला साप चावला. जोरदार पाऊस असल्याने रुग्णालयात जाण्यासाठी कोणतीही व्यवस्था नव्हती. त्यामुळे मी बाईकने मुलाला रुग्णालयात घेऊन आलो. त्याचदरम्यान मी हे धक्कादायक दृष्य पाहिलं" असं ट्विटर युजरने म्हटलं आहे.
देशात कोरोनाने थैमान घातले असून अशा अनेक घटना सातत्याने समोर येत आहेत. एका हिंदी वेबसाईटने याबाबते वृत्त दिले आहे. अनेकांनी कोरोनाचा धसका घेतला असून आपल्या नातेवाईकांचे मृतदेह स्वीकारण्यास नकार दिला आहे. पतीचा मृतदेह हातगाडीवरुन नेऊन पत्नी आणि मुलाने अंत्यसंस्कार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. अथनी या गावात एका व्यक्तीचा मृत्यू झाला. मात्र गावकरी आणि नातेवाईकांनी कोरोनाच्या भीतीने अंत्यसंस्कार करण्यास नकार दिला. पतीच्या मृतदेहाला हात लावण्यासाठी कोणीही पुढे आलं नाही त्यामुळे पत्नीने आपल्या मुलांसोबत हातगाडीवरून पतीचा मृतदेह अंत्यसंस्कारासाठी स्मशानभूमीत नेल्याची मन सुन्न करणारी घटना घडली.
महत्त्वाच्या बातम्या
CoronaVirus News : मच्छर चावल्याने खरंच कोरोनाची लागण होते?; रिसर्चमधून समोर आली महत्त्वाची माहिती
'मोदी सरकारच्या भ्याडपणाची मोठी किंमत देशाला मोजावी लागेल'; राहुल गांधींचा हल्लाबोल