भारतातील कोरोनाग्रस्तांच्या संख्येत वाढ होत असून आतापर्यंत 18,000 हून अधिक जणांना आपला जीव गमवावा लागला आहे. कोरोनाग्रस्तांची संख्या ही सहा लाखांच्या वर पोहोचली आहे. कोरोनाचा वाढता संसर्ग रोखण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संपूर्ण देशात लॉकडाऊनची घोषणा केली आहे. तसेच सुरक्षिततेच्या दृष्टीने लोकांना घराबाहेर न पडण्याचे आवाहन केले आहे. क्वारंटाईन, सोशल डिस्टंसिंग यासारखे खबरदारीचे उपाय करण्यात येत आहेत. मात्र याच दरम्यान एक धक्कादायक घटना समोर आली आहे.
कोरोनाचा वाढता संसर्ग रोखण्यासाठी विविध उपाय केले जात असताना दुसरीकडे हैदराबादमध्ये एक भयंकर घटना घडल्याची माहिती मिळत आहे. एका ज्वेलरचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. धक्कादायक बाब म्हणजे या ज्वेलरने काही दिवसांपूर्वीच आपल्या वाढदिवसाची जंगी पार्टी दिली होती. या पार्टीमध्ये शेकडो लोक होते. त्यामुळे आता जवळपास 100 हून अधिक लोकांचा जीव धोक्यात असल्याची माहिती मिळत आहे. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, हैदराबादमधील एका ज्वेलरने नियमांचं उल्लंघन करत वाढदिवसाच्या पार्टीचं आयोजन केलं होतं. परिसरातील अनेक दिग्गज मंडळींसह 100 लोकांनी या पार्टीसाठी हजेरी लावली होती. जंगी पार्टीमध्ये मोठया संख्येने लोक उपस्थित होते. मात्र त्यानंतर दोन दिवसांतच ज्वेलरची तब्येत बिघडली. कोरोनाची काही लक्षणे आढळून आल्याने त्याला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. चाचणी नंतर त्यांना कोरोनाची लागण झाल्याची माहिती समोर आली.
रुग्णालयात उपचार सुरू असतानाच त्यांचा कोरोनामुळे मृत्यू झाला. त्याच्या मृत्यूने एकच खळबळ उडाली आहे. परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. तसेस प्रशासनाने देखील या प्रकरणाची गंभीर दखल घेऊन वाढदिवसाच्या पार्टीमध्ये उपस्थित असलेल्या लोकांचा तातडीने शोध घेण्या सुरुवात केली आहे. याआधीही काही दिवसांपूर्वी हैदराबादमध्ये एका व्यक्तीने मुलगा झाल्याच्या आनंदात मिठाई वाटली. मात्र दुसऱ्याच दिवशी त्याचा रिपोर्ट कोरोना पॉझिटिव्ह आल्याने त्याच्या संपर्कात आलेल्या लोकांना क्वारंटाईन करण्यात आल्याची घटना समोर आली होती. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.
महत्त्वाच्या बातम्या
CoronaVirus News : बापरे! परीक्षा पडली महागात; तब्बल 32 विद्यार्थ्यांना कोरोनाची लागण
संतापजनक! मास्क न लावण्यावरून झाला वाद, भाजप नेत्याची पोलिसांना मारहाण