नवी दिल्ली - देशात कोरोनाचा कहर पाहायला मिळत आहे. देशातील कोरोनाग्रस्तांची संख्या वाढली असून रुग्णांचा आकडा 26,47,664 वर गेला आहे. गेल्या 24 तासांत कोरोनाचे 57,982 नवे रुग्ण आढळून आले आहेत. तर 941 जणांचा मृत्यू झाला आहे. कोरोनामुळे आतापर्यंत देशभरात तब्बल 50,921 लोकांना जीव गमवावा लागला आहे. याच दरम्यान अनेकांनी कोरोनाची लढाई जिंकली असून त्यावर यशस्वीरित्या मात केली आहे. मात्र आता एक चिंता वाढवणारी माहिती समोर आली आहे.
कोरोनावर मात केल्यानंतरही रुग्णांना पुन्हा एकदा रुग्णालय गाठावं लागत आहे. आयसीयू आणि व्हेंटिलेटर्सवर अनेक दिवस राहून आणि कोरोनावर मात केल्यानंतर डिस्चार्ज मिळूनही रुग्णांना अनेक शारीरिक समस्यांचा सामना करावा लागत आहे. कोरोनातून रुग्ण बरा होतो, त्याला व्हायरसमुक्त घोषित करून डिस्चार्ज दिला जातो. मात्र काही आठवड्यांमध्ये या रुग्णाला व्हायरसशी निगडीत इतर समस्या पुन्हा उद्भवतात. प्रचंड थकवा, श्वास घेण्यात अडथळे या साधारण लक्षणांशिवाय फुफ्फुसाचे आजार, रक्ताच्या गुठळ्या बनणे तसेच स्ट्रोक असे आजार या रुग्णांमध्ये पाहायला मिळत आहेत.
रुग्णालयातूनन डिस्चार्ज दिलेल्या रुग्णांमध्ये अशा समस्या समोर आल्यानंतर रुग्णालयाकडून पावलं उचलण्यात आली आहेत. यामध्ये पोस्ट कोविड केअर देणारे 'डेडिकेटेड क्लिनिक्स' बनवण्यापासून ते व्हॉटसअप ग्रुप बनवण्यापर्यंत अनेक गोष्टींचा समावेश आहे. या ग्रुपमध्ये डॉक्टर आणि रुग्णांचाही समावेश आहे. यामुळे मॉनिटरिंग आणि फीडबॅक प्रोसेसमध्ये सुधारणा होत आहे. काही दिवसांपूर्वी डिस्चार्ज मिळालेल्या कोरोना रुग्णामध्ये ऑक्सिजन प्रमाण खालावल्याचं आणि श्वास घेण्यात अडथळे येत असल्याची माहिती समोर आली आहे.
नोएडामधील एका रुग्णालयाला ही घटना घडली आहे. रुग्णाची परिस्थिती आणखी बिघडण्याच्या आधीच त्याला रुग्णालयात पुन्हा दाखल करण्यात आलं. शारदा रुग्णालयाचे प्रवक्ते डॉ. अजित कुमार यांनी दिलेल्या माहितीनुसार, '45 वर्षीय रुग्णाला जुलै महिन्यात डिस्चार्ज दिला गेला होता आणि ऑगस्टच्या सुरुवातीला त्यांना पुन्हा रुग्णालयात दाखल करावं लागलं कारण त्यांच्या फुफ्फुसांमध्ये इन्फेक्शन होतं तसंच ऑक्सिजन सॅच्युरेशन पातळीही घसरली होती. कोरोनाचा रिपोर्ट निगेटिव्ह आल्यानंतरही त्यांची ही परिस्थिती होती'.
दिल्लीचे सर गंगाराम रुग्णालयाचे वरिष्ठ चेस्ट फिजिशियन डॉ. अरुप बसु यांनी दिलेल्या माहितीनुसार, कोविड-19 मुळे फुफ्फुसांना नुकसान होतं. त्यामुळे इन्फेक्शन संपुष्टात आल्यानंतरही त्या नुकसानीचा परिणाम रुग्णाच्या शरीरावर पाहायला मिळतो. डिश्युजवर असलेले निशाण फुफ्फुसांना योग्य पद्धतीनं काम करण्यासाठी रोखतात आणि अतिरिक्त ऑक्सिजनची गरज भासते. कोरोनावर नियंत्रण मिळवण्यात यश मिळालं असलं तरी या व्हायरसमुळे मोठ्या प्रमाणात लोकांची फुफ्फुसं खराब होण्याची चिंता डॉक्टरांना सतावते आहे. रुग्णांना मधुमेहासारखे आजार असतील तर अशा रुग्णांवर उपचार करणं आणखीनच आव्हानात्मक असल्याचं तज्ज्ञांनी म्हटलं आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.
महत्त्वाच्या बातम्या
CoronaVirus News : आपलेही झाले परके! ...अन् मुलांवर आली वडिलांचा मृतदेह सायकलवरून नेण्याची वेळ
संसदेच्या अॅनेक्स इमारतीमध्ये आग, आगीवर नियंत्रण मिळवण्यात अग्निशमन दलाला यश
CoronaVirus News : आनंदाची बातमी! देशात कोरोनाचा उद्रेक होत असताना 'ही' आकडेवारी सुखावणारी