नवी दिल्ली - देशातही कोरोनाचा धोका वाढला असून रुग्णांच्या संख्येत दिवसागणिक वाढ होत आहे. रुग्णांचा आकडा 65 लाखांवर गेला असून कोरोनाने देशातील तब्बल 1 लाख लोकांचा बळी घेतला आहे. रविवारी (4 ऑक्टोबर) केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, देशात 24 तासांत कोरोनाचे 75,829 नवे रुग्ण आढळून आले होते. तर 940 जणांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे देशातील कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या 65 लाख 49 हजारांवर पोहोचली आहे. याच दरम्यान आज कोरोना लस कधी येणार, देशात कोणाला सर्वप्रथम मिळणार? यासह अनेक प्रश्नांची उत्तरं मिळणार आहेत.
कोरोनावर लस शोधण्यासाठी जगभरात युद्धपातळीवर प्रयत्न सुरू आहेत. 150 हून अधिक लसींवर जगभरात संशोधन आणि चाचणी सुरू आहे. रशियाच्या Sputnik V या लशीला ऑगस्टमध्ये मंजुरी मिळाली होती. त्यानंतर या लसीच्या तिसऱ्या टप्प्यातील निकालाची संपूर्ण जगाला प्रतीक्षा आहे. भारतात देखील कोरोना लसीची 2/3 टप्प्यातील चाचणी सुरू आहे. यांपैकी दोन लसी या भारतीय वैज्ञानिकांनी विकसित केल्या आहेत. केंद्रीय आरोग्य मंत्री डॉ. हर्षवर्धन 'संडे संवाद' या कार्यक्रमाद्वारे कोरोना लसीसह महत्त्वाच्या गोष्टींची माहिती देणार आहेत.
भारतात कोरोनी लसीची स्थिती (स्टेस) काय आहे?
- ICMR-भारत बायोटेकची Covaxin या लसीची दुसऱ्या टप्प्यातील चाचणी अनेक केंद्रांमध्ये सुरू आहे.
- झायडस कॅडिलाची ZyCov-D या लसीची चाचणी माणसांवर सुरू आहे.
- ऑक्सफर्ड-अस्त्राजेनेकाआणि सीरम इन्स्टीट्यूट ऑफ इंडियाच्या Covishield या लसीची 2/3 टप्प्यातील चाचणी सुरू आहे.
कोविड-19 व्हॅक्सीन पोर्टल लॉन्च
केंद्रीय आरोग्य मंत्री डॉ. हर्षवर्धन यांनी 28 सप्टेंबर या दिवशी कोविड-19 च्या व्हॅक्सीन पोर्टलचे उद्घाटन केले होते. इंडियन मेडिकल काउंसिल ऑफ इंडियाने (ICMR) हे पोर्टल तयार केले आहे. यावर लोकांना भारतातील कोरोनाच्या लसीशी संबंधित माहिती पाहता येणार आहेत. हळूहळू विविध आजारांशी संबंधीत लसींची माहिती या पोर्टलवर मिळणार आहे. कोणती लस कोणत्या टप्प्यात आहे आणि त्या त्या टप्प्यातील निकाल काय आहेत, याबाबतची माहिती लोकांना या पोर्टलवर वाचता येणार आहे. ICMR ने हे पोर्टल भारतात सुरू असलेल्या लसनिर्मितीशी संबंधित सर्व माहिती एकाच ठिकाणी मिळणार आहे.
चिंताजनक आकडेवारी! कोरोनाने घेतला तब्बल 1 लाख लोकांचा बळी, देशातील रुग्णांचा आकडा 65 लाखांवर
कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांचा आकडा हा तब्बल एक लाखांवर पोहोचला आहे. सर्वाधिक रुग्णसंख्या असलेल्या देशांच्या यादीत भारत दुसऱ्या स्थानी आहे. कोरोनाग्रस्तांची संख्या सातत्याने वाढत असल्याने चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. देशातील विविध रुग्णालयात रुग्णांवर उपचार सुरू आहेत. तसेच अनेकांनी कोरोनावर यशस्वीरित्या मात केली असून त्यांना उपचारानंतर डिस्चार्ज देण्यात आला आहे. कर्नाटक, केरळ, पंजाब, बिहार, उत्तर प्रदेश, बंगाल आणि आसाममध्ये कोरोना रुग्णांची संख्या ही सातत्याने वाढत आहे.