चंदीगड - देशात कोरोनाचा वाढता संसर्ग रोखण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील लॉकडाऊन वाढविण्याचा निर्णय घेतला. भारतातील कोरोनाग्रस्तांची संख्या ही दोन लाखांवर गेली आहे. कोरोनाच्या संकटात लॉकडाऊनमुळे अनेकांचे विवाह लांबणीवर गेले आहेत. तर काही जण मोजक्याच मंडळीच्या उपस्थित सोशल डिस्टंसिंगच पालन करत लग्न करत आहेत. लॉकडाऊन काळात लग्न करणं एका जोडप्याला महागात पडलं आहे. न्यायालयाने तब्बल 10 हजारांचा दंड ठोठावला आहे.
जोडप्याने कुटुंबियांचा विरोध पत्करून लग्न केलं होतं अन् संरक्षणासाठी न्यायालयात धाव घेतली होती. मात्र विवाहादरम्यान मास्क परिधान न केल्याने न्यायालयाने कारवाई करत 10 हजारांचा दंड ठोठावला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, हे जोडपं गुरुदासपूरचं रहिवासी आहे. प्रेमविवाहानंतर न्यायालयात संरक्षण मिळवण्यासाठी ते गेले होते. पंजाब व हरियाणा उच्च न्यायालयाने या जोडप्याला सुरक्षा पुरवली पण विवाहादरम्यान मास्क न घातल्याने त्यांना 10 हजारांचा दंडही ठोठावला.
कुटुंबीयांच्या विरोधात जाऊन लग्न केल्यानं आपल्या जीवाला धोका असल्याचं जोडप्याचं म्हणणं होतं. न्यायमूर्ती हरिपाल वर्मा यांनी या याचिकेवर निर्देश जारी करत गुरुदासपूरच्या वरिष्ठ पोलीस अधिक्षकांना दाम्पत्याच्या सुरक्षेच्यादृष्टीने योग्य ती पावलं उचलण्याचे आदेश दिले आहेत. न्यायालयात दिलेल्या लग्नाच्या फोटोंमध्ये वर-वधू आणि इतर उपस्थितांनी मास्क घातले नसल्याची माहिती समोर आली. त्यामुळेच जोडप्याला हा दहा हजाराचा दंड भरावा लागला आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.
महत्त्वाच्या बातम्या
Cyclone Nisarga : अरविंद केजरीवालांनी केलं उद्धव ठाकरेंसाठी ट्विट; म्हणाले...
CoronaVirus News : नववीतल्या विद्यार्थ्यानं तयार केली वेबसाईट; कोरोनाच्या खात्रीशीर माहितीचं संकलन
CoronaVirus News : आता 'या' वयोगटातील चिमुकल्यांवर होणार कोरोनाच्या लसीची चाचणी?