नवी दिल्ली - देशामध्ये कोरोनाने थैमान घातले आहे. कोरोनाग्रस्तांची संख्या ही दिवसागणिक वाढत आहे. रुग्णांचा आकडा 26,47,664 वर पोहोचला आहे. तर कोरोनामुळे आतापर्यंत देशभरात तब्बल 50,921 लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. वेगाने पसरणाऱ्या कोरोनामुळे लोकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. अनेकांनी कोरोनाचा धसका घेतला असून आपल्या नातेवाईकांचे मृतदेह स्वीकारण्यास नकार दिला आहे. अशीच एक धक्कादायक घटना समोर आली आहे. मुलांवर वडिलांचा मृतदेह अंत्यसंस्कारासाठी सायकलवरून नेण्याची वेळ आली आहे.
हुबळीमध्ये मन सुन्न करणारी घटना घडली आहे. एका 71 वर्षीय व्यक्तीचा मृत्यू झाला. मात्र नातेवाईकांनी आणि गावकऱ्यांनी कोरोनाच्या भीतीने अंत्यसंस्काराला जाण्यास नकार दिला. तसेच मृतदेहाला हात लावण्यासाठी कोणीही पुढे आले नाही. यामुळे मुलांनी वडिलांचा मृतदेह सायकलवरून स्मशानभूमीत नेल्याची घटना घडली आहे. मृतदेह अशा पद्धतीने स्मशानभूमीत नेताना संपूर्ण गाव पाहत होतं पण कोणीही मुलांच्या मदतीसाठी पुढे आले नाहीत. मिळालेल्या माहितीनुसार, कित्तूर तालुक्यातील एमके हुबळी गावातील व्यक्तीला दोन दिवसांपासून ताप येत होता.
वडिलांची तब्येत ठिक नसल्याने मुलांनी त्यांना जवळच्या आरोग्य केंद्रात उपचारासाठी दाखल केलं. मात्र प्रकृती आणखी बिघडल्याने तसेच कोरोनाची काही लक्षणे आढळून आल्याने तेथील डॉक्टरांनी उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल करण्याचा सल्ला दिला. जिल्हा रुग्णालयात दाखल करण्याआधीच वडिलांचा मृत्यू झाला. त्यावेळी अंत्यसंस्कारासाठी नातेवाईकांनी येण्यास नकार दिला. शेवटी मुलांनी वडिलांचा मृतदेह सायकलवरून स्मशानभूमीत नेला आणि अंत्यसंस्कार केले.
सोशल मीडियावर या घटनेचा एक व्हिडीओही व्हायरल झाला आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. याआधीही काही दिवसांपूर्वी अशीच एक घटना घडली होती. पतीचा मृतदेह हातगाडीवरुन नेऊन पत्नी आणि मुलाने अंत्यसंस्कार केल्याची धक्कादायक घटना समोर आली होती. अथनी या गावात एका व्यक्तीचा मृत्यू झाला. मात्र गावकरी आणि नातेवाईकांनी कोरोनाच्या भीतीने अंत्यसंस्कार करण्यास नकार दिला. पतीच्या मृतदेहाला हात लावण्यासाठी कोणीही पुढे आलं नाही त्यामुळे पत्नीने आपल्या मुलांसोबत हातगाडीवरून पतीचा मृतदेह अंत्यसंस्कारासाठी स्मशानभूमीत नेल्याची मन हेलावून टाकणारी घटना घडली होती.
महत्त्वाच्या बातम्या
संसदेच्या अॅनेक्स इमारतीमध्ये आग, आगीवर नियंत्रण मिळवण्यात अग्निशमन दलाला यश
CoronaVirus News : आनंदाची बातमी! देशात कोरोनाचा उद्रेक होत असताना 'ही' आकडेवारी सुखावणारी