नवी दिल्ली - जगातील सर्वच देश कोरोनाशी सामना करत असून व्हायरसचा वाढता प्रसार रोखण्यासाठी प्रयत्न करत आहेत. भारतातदेखील कोरोनाला आळा घालण्यासाठी व्यापक प्रयत्न करण्यात येत आहे. कोरोनाचा वाढता संसर्ग रोखण्यासाठी देशात लॉकडाऊन सुरू आहे. भारतात कोरोनाग्रस्तांची संख्या 27 लाखांवर पोहोचली असून हा आकडा सातत्याने वाढत आहे. कोरोनामुळे सर्वत्र भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. याच दरम्यान अनेक मन हेलावून टाकणाऱ्या घटना समोर येत आहेत.
कोरोनाच्या धास्तीने एका मुलाने आपल्या वडिलांचे अंत्यसंस्कार करण्यास नकार दिल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. तेलंगणामध्ये ही घटना घडली आहे. मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्यासाठी कोणीच पुढे न आल्याने शेवटी एका स्वयंसेवी संस्थेने पुढाकार घेऊन अंत्यसंस्कार केले आहेत. 'यूथ वेलफेअर तेलंगणा' असं या संस्थेचं नाव आहे. ही संस्था ज्या कुटुंबीयांनी आपल्या नातेवाईकांचे मृतदेह नाकारले आहेत. अशा मृतदेहांवर अंत्यसंस्कार करण्याचं काम करते.
सय्यद जलालुद्दीन जफर हे यूथ वेलफेअर तेलंगणा या संस्थेचे अध्यक्ष आहेत. त्यांनी आत्तापर्यंत अशा 147 लोकांवर अंत्यसंस्कार केले आहेत. 'माझ्याच एका मित्राच्या वडिलांचा कोरोनामुळे मृत्यू झाला. पण त्या मित्राने त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यास नकार दिला. शेवटी आमच्या संस्थेने पुढाकार घेऊन अंत्यसंस्कार केले. माणुसकीच्या नात्याने आम्ही आमचं काम करतो' अशी माहिती जफर यांनी दिली आहे. या संस्थेच्या कामाचं सर्वत्र कौतुक होत आहे.
कोरोनामुळे अनेक जण आपल्या नातेवाईकांचा मृतदेह स्वीकारण्यास नकार देतात. अशा मृतदेहांवर अंत्यसंस्कार करण्याचं मोठं काम संस्था करत आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. हुबळीमध्ये देखील अशीच एक मन सुन्न करणारी घटना घडली आहे. एका 71 वर्षीय व्यक्तीचा मृत्यू झाला. मात्र नातेवाईकांनी आणि गावकऱ्यांनी कोरोनाच्या भीतीने अंत्यसंस्काराला जाण्यास नकार दिला. तसेच मृतदेहाला हात लावण्यासाठी कोणीही पुढे आले नाही. यामुळे मुलांनी वडिलांचा मृतदेह सायकलवरून स्मशानभूमीत नेल्याची घटना घडली आहे. मृतदेह अशा पद्धतीने स्मशानभूमीत नेताना संपूर्ण गाव पाहत होतं पण कोणीही मुलांच्या मदतीसाठी पुढे आले नाहीत.
महत्त्वाच्या बातम्या
"राहुल आणि सोनिया गांधी यांनी चीनकडून पैसे घेतले", भाजपा अध्यक्षांचा हल्लाबोल
Bihar Flood : नि:शब्द! बिहारला पुराचा तडाखा, मन हेलावून टाकणारा फोटो व्हायरल
"काँग्रेसच्या 100 नाराज नेत्यांनी सोनियांना पाठवलेलं पत्र, केली होती 'ही' मागणी"
...म्हणून रोहित पवारांनी मानले पंतप्रधान नरेंद्र मोदींचे आभार
Video - कडक सॅल्यूट! 16 तास पाण्यात अडकलेल्या तरुणाची वायुदलाने अशी केली सुखरुप सुटका
CoronaVirus News : कोरोनापेक्षाही भयंकर व्हायरस आला! संक्रमणाचा धोका दहापटीने वाढला
CoronaVirus News : चिंता वाढली! कोरोनावर मात केल्यानंतरही रुग्णांना गाठावं लागतंय रुग्णालय