नवी दिल्ली - कोरोना व्हायरसने देशात थैमान घातले आहे. पहिल्यांदाच देशात एकाच दिवसात कोरोनाचे तब्बल 40 हजारहून अधिक नवे रुग्ण सोमवारी आढळून आले आले आहेत. त्यामुळे कोरोनाग्रस्तांचा एकूण आकडा आता 11 लाखांहून अधिक झाला आहे. मात्र या आजारातून बरे होणाऱ्यांची संख्याही 7 लाखांहून जास्त झाल्याने सर्वांनाच मोठा दिलासा मिळाला आहे. याच दरम्यान अनेक दिलासादायक घटना देखील समोर येत आहेत. कोरोनावर मात करणाऱ्यांची संख्या देखील दिवसागणिक वाढत आहे.
कोरोनाग्रस्तांवर उपचार करण्यात यावे यासाठी अनेक ठिकाणी कोरोना केअर सेंटर उभारण्यात आले आहेत. अशाच एका सेंटरमधील कोरोनाग्रस्तांच्या भन्नाट डान्सचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल झाला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, कर्नाटकच्या बरेलीमधील एका कोविड केअर सेंटरमध्ये कोरोना रुग्णांनी एका लोकप्रिय गाण्यावर जबरदस्त डान्स केला आहे. या व्हिडीओमध्ये रुग्ण बरे झाल्यावर डान्स करून आनंद व्यक्त करताना दिसत आहेत.
कोविड केअर सेंटरमधील कोरोना रुग्णांचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला असून सर्वच याचीच चर्चा रंगली आहे. सेंटरमध्ये खास रुणांसाठी एका फ्लॅश मॉबचं आयोजन करण्यात आलं होतं. त्यावेळी कोरोनाग्रस्तांनी लोकप्रिय गाण्यावर ठेका धरला आणि मनसोक्त डान्स केल्याचं पाहायला मिळत आहे. एएनआय या वृत्तसंस्थेनेही आपल्या ट्विटर अकाऊंटवरून याबाबतचा व्हिडीओ शेअर केला आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.
कोरोनाचा वेगाने होणारा संसर्ग रोखण्यासाठी विविध उपाय केले जात आहेत. काळजी घेतली जात आहे. याआधीही रुग्णालयात डान्स करणाऱ्या एका डॉक्टरचा व्हिडीओ जोरदर व्हायरल झाला होता. जगभरातील कोरोनाग्रस्तांची संख्या ही सातत्याने वाढत आहे. वेगाने पसरणाऱ्या आणि भीतीचे वातावरण निर्माण करणाऱ्या कोरोनामुळे आतापर्यत 613,213 हून अधिक लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. तर 14,852,700 लोकांना त्याचा संसर्ग झाल्याची माहिती मिळत आहे. तर 8,906,690 लोक बरे झाल्याची माहिती मिळत आहे.
महत्त्वाच्या बातम्या
धक्कादायक! ...म्हणून चिमुकल्यावर आली आईसह रुग्णालयात स्ट्रेचर ओढण्याची वेळ
"पवार साहेब, मोदी-शाह तुमच्या म्हणण्याप्रमाणे चालले असते तर देशाची ही अवस्था झाली नसती"
CoronaVirus News : धक्कादायक! कोरोना रुग्णालयात डुक्करांचा मुक्त संचार; Video जोरदार व्हायरल
CoronaVirus News : इथे ओशाळली माणुसकी! ...अन् रुग्णालयाबाहेर भर पावसात कित्येक तास पडून होती महिला