नवी दिल्ली - देशात कोरोना लसीकरणा वेगाने सुरू आहे. याच दरम्यान दिल्ली सरकारने 18 वर्षांवरील सर्वांना मोफत कोरोना लस (Corona Vaccine) देण्याची घोषणा केली आहे. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल (Arvind Kejriwal ) यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. दिल्ली सरकारने 1.34 कोटी लसींची ऑर्डर दिली आहे. 1 मे पासून दिल्लीत लसीकरण मोठ्या प्रमाणात केलं जाईल असंही मुख्यमंत्री केजरीवाल यांनी म्हटलं आहे. त्यानंतर आता दिल्ली सरकारने बँकॉकवरुन ऑक्सिजनचे 18 टँकर्स मागवण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी हवाई दलाची विमाने देण्याची मागणी केंद्र सरकारकडे केली आहे.
दिल्लीतही ऑक्सिजनची मोठी कमतरता भासू लागली आहे. ऑक्सिजनअभावी अनेक रुग्णांना आपला जीव गमवावा लागला आहे. याच दरम्यान दिल्ली सरकारने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. उद्यापासून ऑक्सिजनचे हे टँकर्स यायला सुरुवात होणार असल्याची माहिती अरविंद केजरीवाल यांनी दिली. केंद्र सरकारशी यासंदर्भात होणारी चर्चा सकारात्मक असल्याचं सांगितलं. तसेच फ्रान्समधून 21 ऑक्सिजन प्लान्ट्स मागवण्यात आले असून वेगवेगळ्या रुग्णालयांमध्ये हे प्लान्ट्स बसवण्यात येतील अशी माहितीही मुख्यमंत्र्यांनी दिली आहे.
"दिल्ली सरकार येत्या एक महिन्यात एकूण 44 ऑक्सिजन प्लान्ट बसवणार आहे. त्यापैकी 21 प्लान्ट्स फ्रान्सवरुन येणार असून 8 प्लान्ट्स केंद्र सरकार देणार आहे. तर उरलेले सर्व प्लान्ट्स दिल्ली सरकार बसवणार आहेत. वेगवेगळ्या रुग्णालयात हे प्लान्ट्स बसवण्यात येणार आहेत. यामुळे रुग्णालयातील ऑक्सिजनची कमतरता दूर करता येणार आहे. आम्ही देशातल्या काही मोठ्या उद्योगपतींनाही मदतीसाठीची पत्रे पाठवली होती. त्यांनीही मदत करण्याचं मान्य केलं आहे" अशी माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली आहे. तसेच अरविंद केजरीवाल यांनी दिल्लीला मदत करणाऱ्या सर्वांचे आभार मानले आहेत.
दिल्लीत मिळणार मोफत कोरोना लस; मुख्यमंत्री अरविंद केजरीवालांची मोठी घोषणा
दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी लसींच्या दरावरून काही प्रश्न उपस्थित केले आहेत. केंद्र, राज्य आणि खासगी रुग्णालयांना एकाच किंमतीत लस मिळाली पाहीजे अशी मागणी त्यांनी केली. लस निर्मिती करण्य़ाऱ्या कंपन्याचा दावा आहे की, 150 रुपये फायदा होतो. मग वेगवेगळे दर का? असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला. नफा कमवण्यासाठी पूर्ण आयुष्य पडलं आहे, असा टोलाही केजरीवालांनी लगावला. तसेच केंद्र सरकारने यात दखल घेत दर निश्चित केले पाहीजेत अशी सूचना केली आहे.
देशात 1 मे पासून 18 वर्षांवरील सर्वांना लस देण्याचं जाहीर करण्यात आलं आहे. त्यामुळे सीरम इंस्टीट्यूट आणि भारत बायोटेकनं लसींचे दर निश्चित केले आहेत. यात कोविशील्ड राज्य सरकारला 400 रुपये, खासगी रुग्णालयांना 600 रुपयांत मिळणार आहे. तर कोवॅक्सिन राज्य सरकारला 600 रुपये, खासगी रुग्णालयांना 1200 रुपयांत मिळणार आहे. दूसरीकडे ही लस केंद्र सरकारला 150 रुपयांत दिली जाणार आहे. त्यामुळे विरोधकांनी केंद्र सरकारवर टीकेची झोड उठवली आहे.