नवी दिल्ली - केंद्र सरकारने लॉकडाऊनच्या तिसऱ्या टप्प्यात दारुची दुकाने उघडण्यासाठी परवानगी दिली आहे. लॉकडाऊन-3 मध्ये सरकारने दारुची दुकाने उघडण्यासाठी काही अटी घातल्या आहेत. यामध्ये सोशल डिस्टंसिंगचे पालन करण्यास सांगितले आहे. मात्र अनेक ठिकाणी दारू पायी सोशल डिस्टंसिंगचा फज्जा उडाल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. दारुची दुकाने सुरू झाल्याने मद्यप्रेमी लांबच लांब रांगा लावत आहेत. तसेच यामुळे तळीरामांना मोठा दिलासा मिळाला आहे.
दारुसाठी होणारी गर्दी टाळण्यासाठी दिल्ली सरकारने एक तोडगा काढला आहे. दिल्लीतील मद्यप्रेमींना घरबसल्या दारूसाठी बुकिंग करता येणार आहे. ई-कूपन सिस्टमच्या मदतीने ऑनलाईन टोकन व्यवस्था सुरू करण्यात आली आहे. दुकानासमोरील रांगा कमी करण्यासाठी आणि होणारी गर्दी टाळण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. यासाठी दिल्ली सरकारने https://www.qtoken.in/ या वेबसाईटची लिंक दिली आहे. या वेबसाईटवर रजिस्ट्रेशन केल्यानंतर दारू खरेदीसाठी जवळचं दुकान निवडावं लागेल. त्यानंतर तारीख आणि वेळ सांगितली जाईल. त्यावेळेमध्ये संबंधित व्यक्ती रांगेमध्ये उभं न राहता दुकानामध्ये जाऊन दारू खरेदी करू शकणार आहे.
दिल्ली सरकारने मंगळवारपासून दारू विक्रीवर 70 टक्के कोरोना महारोगराई कर लादण्याचा निर्णय घेतला आहे. त्याला 'स्पेशल कोरोना फी' असे नाव देण्यात आले आहे. सरकारच्या या निर्णयामुळे कोरोना विषाणूपासून बचाव करण्यासाठी राबविण्यात आलेल्या लॉकडाऊनमध्येच मोठ्या प्रमाणात नुकसान झालेल्या महसुलाला चालना मिळणार आहे. हा नियम मंगळवार सकाळपासून लागू झाला असून, मद्यपान करणार्यांना आता अधिक पैसे मोजावे लागतील हेसुद्धा स्पष्ट करण्यात आले आहे.
छत्तीसगडमध्येही दारूची खरेदी करण्यासाठी अनेकांनी गर्दी केल्याचे दिसून आले. त्यामुळे ही गर्दी कमी व्हावी या उद्देशाने छत्तीसगड सरकारने दारूची होम डिलिव्हरी करण्याचा निर्णय घेतला आहे. छत्तीसगड सरकारने राज्यात दारूची होम डिलीव्हरी करण्यास सुरुवात केली आहे. एक ग्राहक एकावेळी 5000 ml पर्यंतच्या दारूची ऑनलाइन ऑर्डर करू शकतो. याचे होम डिलिव्हरी शुल्क 120 रुपये असणार आहे.
दरम्यान, दारू खरेदीसाठी लागणाऱ्या रांगा, त्यामुळे निर्माण होणारा गोंधळ, कोरोनाचा प्रादुर्भाव वाढण्याची भीती यामुळे आता दारूची ऑनलाईन विक्री करण्याचा विचार दारुची निर्मिती करणाऱ्या कंपन्यांकडून सुरू आहे. दारू विक्रीतून सरकारला मोठ्या प्रमाणात महसूल मिळतो. गेल्या चाळीस दिवसांपासून देशात लॉकडाऊन सुरू असल्याने अर्थव्यवस्था ठप्प आहे. त्यामुळे सरकारला मिळणारा महसूलात घट झाली आहे. त्याच पार्श्वभूमीवर केंद्राने दारू विक्रीस परवानगी दिली आहे. मात्र, दारू खरेदीसाठी होणारी गर्दी पाहता सरकारसमोर वेगळीच समस्या निर्माण झाली आहे.
महत्त्वाच्या बातम्या
CoronaVirus News : कोरोनाला रोखणारा आयुर्वेदिक काढा, 6000 लोकांवर चाचणी केल्याचा गुजरात सरकारचा दावा
CoronaVirus News : धक्कादायक! डोळ्यांमधूनही होतो कोरोनाचा संसर्ग; संशोधकांचा दावा