नवी दिल्ली - कोरोनाचा वाढता संसर्ग रोखण्यासाठी देशात आणखी दोन आठवड्यांसाठी लॉकडाऊन वाढविण्यात आला आहे. देशात 4 मे पासून 17 मे पर्यंत लॉकडाऊन असणार आहे. यामध्ये रेड झोनमध्ये कडक संचारबंदी असणार आहे. तर ग्रीन झोनमध्ये उद्योगधंदे सुरू करण्यास परवानगी देण्यात आली आहे. केंद्र सरकारने लॉकडाऊनच्या तिसऱ्या टप्प्यात दारुची दुकाने उघडण्यासाठी परवानगी दिली आहे. लॉकडाऊन-3 मध्ये सरकारने दारुची दुकाने उघडण्यासाठी काही अटी घातल्या आहेत. यामध्ये सोशल डिस्टंसिंगचे पालन करण्यास सांगितले आहे. मात्र अनेक ठिकाणी दारू पायी सोशल डिस्टंसिंगचा फज्जा उडाल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.
दारुची दुकाने उघडणार असल्याने मद्यप्रेमी सकाळपासूनच लांबच लांब रांगा लावत आहेत. दुकाने उघडणार म्हणून तळीरामांना मोठा दिलासा मिळाला आहे. दिल्ली सरकारनेही मद्यावर अतिरिक्त 70 टक्के कोरोना महारोगराई कर लादण्याचा निर्णय घेतला असून, त्याची अंमलबजावणी मंगळवारपासून करण्यात येणार आहे. याच दरम्यान एका मद्यप्रेमीने दारुच्या वाढलेल्या किंमतीवर प्रतिक्रिया दिली आहे. 70 टक्के कर वाढल्याचं वाईट वाटत नाही. तर हे पैसे म्हणजे आमच्याकडून देशासाठी केलेलं एक प्रकारचं दान आहे असा अजब दावा एका व्यक्तीने केला आहे.
तरुणाचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल झाला आहे. 'मी सकाळी सहा वाजल्यापासून येथे आलो आहे. माझा मित्र तर पहाटे चारपासून आहे. आम्हाला येथे टोकन क्रमांकाचे वाटप करण्यात आले आहे. मात्र ते कामही गिऱ्हाईकांपैकीच कोणीतरी करत आहे. 9 वाजता दुकान उघडण्याची वेळ आहे पण त्याआधीच म्हणजे 8.55 वाजता पोलीस येथे दाखल झाले आहेत. आता ही सर्व व्यवस्था अयशस्वी होण्यामागे कोण आहे आणि ती नीट कोण करणार हे जनतेला सांगावं' असं या मद्यप्रेमीने म्हटलं आहे.
दिल्लीमधील दारुवरील कर 70 टक्क्यांनी वाढवण्यात आल्यासंदर्भात प्रश्न विचारला असता त्याने कर वाढल्याबद्दल वाईट वाटलं नसल्याचं म्हटलं आहे. '70 टक्के कर वाढल्याचं कोणाला काहीही वाईट वाटलेलं नाही. हे पैसे म्हणजे आमच्याकडून देशासाठी केलेलं एक प्रकारचं दान आहे. एका मोठ्या समस्येला देश तोंड देत असताना आम्ही देशाच्या सोबत आहोत' असं देखील त्याने म्हटलं आहे. एएनआय या वृत्तसंस्थेने याबाबतचा एक व्हिडीओ पोस्ट केला आहे.
महत्त्वाच्या बातम्या
CoronaVirus News : कोरोनाचा हाहाकार! जगभरात तब्बल 2,52,675 जणांचा मृत्यू; अमेरिकेत परिस्थिती गंभीर
CoronaVirus News : खोकल्याचं औषध घेत असाल तर वेळीच व्हा सावध, वाढू शकतो कोरोनाचा धोका?