नवी दिल्ली - देशात कोरोनाचा कहर पाहायला मिळत असून कोरोनाग्रस्तांची संख्या एक कोटीच्या वर गेली आहे. तर आतापर्यंत अनेकांचा मृत्यू झाला आहे. देशात गेल्या 24 तासांत कोरोनाचे 62,258 नवे रुग्ण आढळून आले आहेत. तर 291 जणांचा मृत्यू झाला आहे. कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी सर्वोतोपरी प्रयत्न केले जात आहेत. देशातील विविध रुग्णालयात रुग्णांवर उपचार सुरू आहेत. याच दरम्यान सोशल मीडियावर कोरोनाबाबत अनेक मेसेज हे सातत्याने व्हायरल होत आहे. सध्या मेदांता रुग्णालयाचे डॉक्टर नरेश त्रेहन (Dr Naresh Trehan) यांच्या नावाने ऑडिओ क्लिप जोरदार व्हायरल होत आहे.
सोशल मीडियावर कोरोनाबाबत तुफान व्हायरल होणाऱ्या या ऑडिओ क्लिपमध्ये एका व्यक्तीने देशातील कोरोनाच्या वाढत्या धोक्याबाबत लोकांना इशारा दिला आहे. जागतिक आरोग्य संघटनेने दिलेल्या माहितीचा हवाला देत एका व्यक्तीने भारतात 27 मार्च ते 14 एप्रिल पर्यंत परिस्थिती गंभीर आहे. याच दरम्यान भारतात कोरोना रुग्णांची संख्या ही वेगाने वाढणार असल्याचं म्हटलं आहे. तसेच या क्लिपमध्ये हळद आणि मिठाच्या पाण्याने गुळण्या करा असा सल्ला देखील लोकांना देण्यात येत आहे. या व्यक्तीने क्लिपमध्ये आपली ओळख सांगितलेली नाही. मात्र या ऑडिओ क्लिपसोबत व्हायरल होणाऱ्या मेसेजमध्ये डॉ. नरेश त्रेहन यांनी हा सल्ला दिल्याचा दावा करण्यात आला आहे. मात्र याबाबतच सत्य आता समोर आलं असून हे फेक असल्याचं म्हटलं आहे.
इंडिया टुडेच्या अँटी फेक न्यूज वॉर रुम (AFWA) ने व्हायरल ऑडिओ क्लिपसोबत केला जाणारा दावा चुकीचा असल्याचं म्हटलं आहे. तसेच क्लिपमध्ये ऐकू येणारा आवाज हा डॉ. नरेश त्रेहन यांचा नसून दुसऱ्या कोणत्यातरी व्यक्तीचा असल्याचं म्हटलं आहे. तसेच त्रेहन यांनी असा कोणताही सल्ला दिलेला नाही. मेदांता रुग्णालयाने देखील आपल्या ट्विटर अकाऊंटवरून हे वृत्त फेटाळून लावलं आहे. रुग्णालयाने हा व्हिडीओ खोटा असल्याचं म्हटलं आहे. तसेच डॉ. त्रेहन यांच्या आवाजात हा मेसेज नसल्याचं म्हटलं आहे. गेल्या काही दिवसांपासून हा मेसेज जोरदार व्हायरल होत आहे.
कोरोनाचा विस्फोट! गेल्या 24 तासांत तब्बल 62,258 नवे रुग्ण, पुन्हा एकदा धडकी भरवणारी आकडेवारी
वेगाने पसरणाऱ्या कोरोना व्हायरसचा जगभरात उद्रेक पाहायला मिळत आहे. कोरोनाग्रस्तांची संख्या ही तब्बल 12 कोटींच्या वर गेली असून लाखो लोकांचा मृत्यू झाला आहे. तर दुसरीकडे भारतात कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी लॉकडाऊन सुरू आहे. याच दरम्यान चिंताजनक आकडेवारी समोर आली आहे. देशात धोका वाढला असून कोरोनाच्या आकडेवारीने रुग्णांच्या संख्येचा रेकॉर्ड मोडला आहे. रुग्णांची संख्येने एक कोटीचा टप्पा पार केला आहे. कोरोनातून बरे होणाऱ्या रुग्णांची संख्या वाढत असताना पुन्हा एकदा धडकी भरवणारी आकडेवारी समोर येत आहे.
गेल्या 24 तासांत रुग्णसंख्येत वाढ झाली असून आता चिंता वाढवणारी आकडेवारी समोर आली आहे. देशातील रुग्णसंख्येने उच्चांक गाठला आहे. शनिवारी (27 मार्च) केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, देशात 24 तासांत कोरोनाचे 62,258 नवे रुग्ण आढळून आले आहेत तर 291 लोकांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे देशातील कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या 1,19,08,910 पोहोचली. कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांचा आकडा 1,61,240 वर पोहोचला आहे. गेल्या काही दिवसांपासून रुग्णांचा आकडा सातत्याने वाढत आहे.